ऑनलाइन टीम / मुंबई :
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य चुकीचंच होतं असं सांगत अशी वक्तव्यं यापुढे कुणाकडूनही खपवून घेतली जाणार नाहीत असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.
संजय राऊत यांनी एका जाहीर कार्यक्रमात करीम लालाला भेटण्यासाठी माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी येत असत असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला. दरम्यान, आज राऊत यांनी आपले विधान मागे घेतले आहे.
याबद्दल बोलताना थोरात म्हणाले, महापुरुषांबद्दल असं कुणीही बोलू नये. संजय राऊत यांचे वक्तव्य चुकीचे होते. त्यावर आमची नाराजी होती. आम्ही याबाबत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळवली आहे. मात्र, भविष्यात अशा गोष्टी खपवून घेणार नाही. या गोष्टी त्यांनी टाळल्या पाहिजे, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.









