वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑलिम्पिकमध्ये फेन्सिंग (समशेरबाजी) या क्रीडा प्रकारात भाग घेणारी पहिली भारतीय बनलेली भवानी देवी पुढील वर्षी चार आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सहभागी होणार आहे. या स्पर्धांत सहभागी होण्यासाठी तिला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने 8.16 लाख रुपये मंजूर केले आहेत.
ऍन्युअल कॅलेंडर ट्रेनिंग अँड कॉम्पिटिशन योजना पाहिल्यानंतर तिच्यासाठी ही रक्कम मंजूर करण्यात आल्याचे मंत्रालयाने सांगितले. यावर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भवानी देवीने वैयक्तिक सेबरमध्ये पहिली फेरी जिंकल्यानंतर दुसऱया फेरीत ती पराभूत झाली होती. जॉर्जियातील बिलिसी येथे 4 जानेवारीपासून ती ट्रेनिंग शिबिरात सहभागी होणार आहे. त्यानंतर याच शहरात 14 ते 16 जानेवारी या कालावधीत होणाऱया आंतरराष्ट्रीय फेन्सिंग फेडरेशनची (एफआयई) विश्वचषक स्पर्धेत ती भाग घेईल. त्यानंतर जानेवारीच्या अखेरीस 28, 29 रोजी बल्गेरियातील प्लोव्हदिव येथे होणाऱया विश्वचषक स्पर्धेतही ती भाग घेणार आहे.
महिलांच्या वैयक्तिक सेबरमधील जागतिक क्रमवारीत भवानी देवी सध्या 55 व्या स्थानावर असून ग्रीस व बेल्जियम येथे होणाऱया एफआयईच्या उर्वरित विश्वचषक स्पर्धेतही भाग घेणार आहे. या स्पर्धा अनुक्रमे 4-5 मार्च व 18-19 मार्च रोजी होणार आहेत. क्रीडा मंत्रालयाने अलीकडेच भारतीय फेन्सिंग असोसिएशनला (एफएआय) 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 3 कोटी रुपये मंजूर केले होते.









