प्रतिनिधी / बेळगाव
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीसह बेळगावला पावसाने झोडपून काढले. सोसाटय़ाच्या वाऱयामुळे बेळगाव शहर व तालुक्मयात वीजपुरवठा ठप्प झाला. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शनिवारी रात्रीपासून रविवारी दिवसभर हेस्कॉम तसेच केपीटीसीएल कर्मचाऱयांचे काम सुरू होते. रविवारी झालेल्या भर पावसातही वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे या कर्मचाऱयांचे कौतुक केले जात आहे.
चक्रीवादळाच्या माऱयामुळे संपूर्ण वीजव्यवस्था कोलमडली. ठिकठिकाणी झाडे व फांद्या पडून नुकसान झाले. लाईट जाताच नागरिकांनी हेस्कॉमच्या कार्यालयात फोन करण्यास सुरुवात केली. हेस्कॉममध्ये अनेक कर्मचाऱयांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे ते घरी आहेत. त्यामुळे जितके कर्मचारी कामावर आहेत त्यांना घेऊनच दुरुस्तीचे काम करावे लागत आहे. सोसाटय़ाचा वारा असल्याने घरगुती कनेक्शनमध्ये कार्बन पकडल्यामुळे वीजपुरवठा बंद होत होता. प्रत्येकाच्या घरी जाऊन दुरुस्ती करणे शक्मय नसल्यामुळे प्रथमतः मोठी दुरुस्ती केली जात होती.
दिवसभरात प्रत्येक विभागामध्ये हजार ते बाराशे तक्रारींची नोंद झाली आहे. त्यामुळे आम्हीही माणसं आहोत, आम्हीही थकतो, याचा विचार लोकांनी करावा. दिवस-रात्र मेहनत करून पावसात भिजत दुरुस्तीचे काम सुरू ठेवण्यात आले आहे, अशी विनवणी कर्मचारी नागरिकांना करीत होते. तरीदेखील काहीजण उर्मटपणे कर्मचाऱयांशी संवाद साधत असल्याचे दिसून आले. तरीही रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू ठेवण्यात आले होते.









