मण्णूर येथील घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली
वार्ताहर / हिंडलगा
भरधाव टिप्पर विद्युतखांबाला धडकून रस्त्याकडेला कलंडल्याची घटना गुरुवार दि. 31 रोजी दुपारी मण्णूर येथे घडली. यामध्ये सुदैवानेच कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण वीजखांब कोसळल्याने हेस्कॉमचे नुकसान झाले आहे.
याबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार टिप्परचालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्यामुळे मण्णूरहून बेळगावच्या दिशेला खडी घेऊन जाताना त्याचा टिप्परवरील ताबा सुटल्याने भरधाव असलेला टिप्पर थेट वीजखांबाला धडकून रस्त्याकडेला असलेल्या गटारीमध्ये कलंडला.
काही दिवसांपूर्वीच मण्णूर गावच्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. त्यामुळे परिसरात असलेल्या क्वारींमधून खडी व दगडांची वाहतूक करणारी वाहने सुसाट जात आहेत. त्यामुळे अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून पादचारी व दुचाकीचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. परिणामी ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित क्वारीमालक तसेच टिप्परचालकांवर कारवाई करावी. अन्यथा परिसरातील सर्व खडीमशीन बंद करण्याची मागणी होत आहे.









