प्रतिनिधी / इचलकरंजी
भरदिवसा घरफोडी करणाऱ्या पुलाची शिरोली ( ता . हातकणगले ) येथील पोलीस रेकॉर्डवरील एका वयोवृद्ध महिलेला पोलिसांनी अटक केली. सुप्रभा दत्तात्रय महाडिक ( वय ७७ , रा . कोरगांवकर कॉलनी , माळवाडी , पुलाची शिरोली ) असे तिचे नाव आहे. पोलिसांनी तिच्याकडून एका घरफोडीतील १० हजार ९७५ रुपये किमतीची चांदीची देव पूजेची भांडी जप्त केली. या वृध्देने इचलकरंजीमध्ये पाच भरदिवसापूर्वी घरफोडी केली होती. ही कारवाई इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे.
येथील कागवाडे मळ्यातील एका अपार्टमेंटमध्ये पाच दिवसांपूर्वी भरदिवसा घरफोडी झाली होती. यांची शिवाजीनगर पोलिसात नोंद आहे. या घरफोडीची तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाबरोबर इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समांतर सुरु केला होता. याचदरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांना कबनूर गावानजीक एक वृध्द महिला चोरीची चांदीची भांडी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती बातमीदाराकडून समजली. त्यावरुन पोलिसांनी या परिसरात सापळा लावून महिलेचा शोध सुरु केला याचदरम्यान सुप्रभा महाडिक ही वयोवृध्द महिला संशयीतपणे फिरत असल्याची दिसून आले.
त्यावरुन तिला ताब्यात घेवून तिच्या पर्सची झडती घेतली असताना पोलिसांना त्यामध्ये चांदीची देवपुजेची भांडी मिळून आली . त्याबाबत तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने पाच दिवसापूर्वी इचलकरंजीतील कागवाडे मळ्यातील एका अपार्टमेंटमधील प्लॅटमध्ये घरफोडी करुन ही चांदीची भांडी चोरल्याची पोलिसांना कबुली दिली . त्यावरुन तिला अटक केली असून , ही वृद्धा घरफोडी करणारी पोलीस रेकॉर्डवरील आहे . तिच्याविरोधी यापूर्वी भरदिवसा घरफोडी केल्याचे काही गुन्हे नोंद असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली .