वीरप्पा मोईलींची उपस्थिती : कुडची येथे भरतेश होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे स्थलांतर करणार
प्रतिनिधी /बेळगाव
भरतेश एज्युकेशन ट्रस्टतर्फे यावषी हीरकमहोत्सव साजरा केला जात आहे. त्यानिमित्त बुधवार दि. 20 रोजी सायंकाळी 5 वा. हालगा येथील भरतेश सेंट्रल स्कूलच्या मैदानावर विशेष कार्यक्रम होणार आहे. भरतेश सेंट्रल स्कूलचे नामकरण श्रीमती सरोजिनी जीनदत्त देसाई, भरतेश सेंट्रल स्कूल या नावाने केले जाणार आहे. या सोहळय़ाला माजी केंद्रीय कायदामंत्री व माजी मुख्यमंत्री डॉ. एम. वीरप्पा मोईली उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य विनोद दोड्डण्णावर यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
भरतेश संस्थेची स्थापना 1962 साली एका शाळेद्वारे झाली होती. आज या संस्थेच्या 19 शिक्षण संस्था असून, 8 हजार विद्यार्थी व 800 कर्मचारी आहेत. आजवर भरतेश संस्थेतून 36 हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. हीरक महोत्सवानिमित्त संस्थेने वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. कुडची येथे भरतेश होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे स्थलांतर व समुदाय भवन बांधले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बुधवारी आयोजित कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. त्याचबरोबर बेळगाव परिसरात सर्वोत्तम काम करणाऱया एका व्यक्तीचा भरतेश हीरक महोत्सव पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. तसेच दोन खेडी दत्तक घेऊन तेथे सर्व सोयीसुविधा पुरविल्या जातील, असे दोड्डण्णावर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेवेळी भरतेशचे खजिनदार भूषण मिरजी, सचिव श्रीपाल खेमलापुरे, सहसचिव प्रकाश उपाध्ये, कार्यकारी मंडळाचे सदस्य हिराचंद कलमणी, शरद पाटील, अशोक दानवडे, वसंत कोडचवाड यासह इतर उपस्थित होते.









