प्रतिनिधी /बेळगाव
हलगा येथील पी. डी. भरतेश ऑफ नर्सिंग बीएससीच्या 17 व्या बॅचचा व जीएनएम नर्सिंगच्या दुसऱया बॅचचा दीपदान व शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेंगळूर येथील आरजीयूएचएसचे माजी कुलगुरू डॉ. एस. सच्चिदानंद उपस्थित होते.
यावेळी एस. सच्चिदानंद म्हणाले, नर्सिंग कर्मचारी हे रुग्ण व गरजूंसाठी आयुष्यभर निरंतर सेवा देतात. विद्यार्थ्यांनी या व्यवसायाशी बांधिलकी राखत नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे सांगितले. तालुका आरोग्य अधिकारी शिवानंद मास्तीहोळी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून या क्षेत्रात आल्याबद्दल अभिनंदन केले. डॉ. देवगौडा यांनी वैद्यकीय सेवाप्रणालीचा नर्सिंग हा कणा असल्याचे सांगितले.
यावेळी नर्सिंग कॉलेजच्या अध्यक्षा डॉ. सावित्री दोड्डण्णावर, भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे खजिनदार भूषण मिर्जी, गव्हर्निंग कौंसिलचे सदस्य विनोद दोड्डण्णावर, सुरेंद्र शहापुरे उपस्थित होते. प्राचार्या डॉ. संगीता मोरेश्वर यांनी स्वागत केले. महेश रेनिबल यांनी आभार मानले. यावेळी नर्सिंग कॉलेजचे सदस्य उपस्थित होते.









