कंपनी ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा बळी
प्रतिनिधी/ खेड
मुंबई-गोवा महामार्गावर भरणे-शिंदेवाडी येथे सोमवारी रात्री 9.30 च्या सुमारास मातीच्या ढिगाऱयावरून कोसळून झालेल्या अपघातात सर्फराज हनिफ जसनाईक (32, रा. भोस्ते) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
सर्फराज आपल्या दुचाकीने कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेणाऱया आईला जेवणाचा डबा देण्यासाठी गेला होता. तेथून घरी परत येत असताना हा अपघात घडला. अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या सर्फराज यास उपचारासाठी नेत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला. हा अपघात महामार्ग चौपदरीकरण ठेका घेतलेल्या कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
भरणे परिसरात चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. शिंदेवाडीनजीक चौपदरीकरणाचे काम अर्धवट स्थितीत असून या ठिकाणी ठेकाधारक कंपनीने सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची खबरदारी घेतलेली नाही. मोरीच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले असून या ठिकाणी सूचना फलकही लावलेला नाही या ठिकाणचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला असतानाही तेथे सूचनाफलक लावलेला नाही. यामुळेच सर्फराजला रस्त्याचा अंदाज न आल्याने मातीच्या ढिगाऱयावरून दुचाकी कोसळून तो थेट मोरीच्या खोदकामात कोसळून गंभीर जखमी झाला. आतापर्यंत अर्धवट स्थितीतील या मोरीच्या ठिकाणी 3 छोटे-मोठे अपघात घडले आहेत. तरीही ठेकाधारक कंपनीने सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना न केल्यामुळे या तरूणास हकनाक प्राणास मुकावे लागल्याचे मत व्यक्त केले जात आहे.









