कोरोना या एका विषाणुचा अवघ्या विश्वाने धसका घेतला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जगात काही लाखात तर भारतात 84 झाली आहे. जगभर अफवा, अज्ञान, भीती आणि समज-गैरसमज यांचे थैमान सुरू आहे. जनजीवन कठीण होताना दिसते आहे. पुढे काय वाढून ठेवले आहे याची चिंता आणि धास्ती घोंगावते आहे. एकूणच भय इथले संपत नाही अशी स्थिती आहे. स्वाईन फ्लूनंतर कोरोनाचा जागतिक उद्रेक समोर आला आहे. चीन, दक्षिण कोरिया, इराण, इटली या पाठोपाठ अमेरिका, भारत, पाकिस्तानमध्ये कोरोनाचे रुग्ण व संशयित दिसून आले आहेत. मृत्युचे प्रमाण अल्प असले तरी कोरोनावर लस उपलब्ध नसल्याने भीती बळावली आहे. या साऱया पार्श्वभूमीवर संयम, शिस्त, स्वच्छता आणि जबाबदारी यांचे पालन करत कोरोनाला पळवून लावण्याची गरज निर्माण झाली आहे. जगभर कोरोनाबाधित रुग्णांची व संशयितांची संख्या लाखाच्या पुढे असली तरी कोरोनामुळे मृत्युची संख्या पाच हजारपेक्षा जास्त नाही. पण यामुळे जागतिक आरोग्य क्षेत्रात आणिबाणी निर्माण झाली आहे. अंटार्क्टिका वगळता सर्व खंडात कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यांची संख्या वाढत आहे. ओघानेच ही विश्व आपत्ती ठरली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना ही जागतिक महामारी म्हणून घोषित केली आहे. इटलीमध्ये सुमारे दीड कोटी नागरिकांनी स्वत:ला राष्ट्रीय कर्तव्य म्हणून घरात कोंडून घेतले आहे. गर्दी व संपर्क टाळला आहे. तेथे या कर्तव्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. आपल्याकडेही शाळा, कॉलेज, मॉल्स, चित्रपट, नाटय़गृहे, मंगल कार्यालये, जत्रा, यात्रा स्थगित कराव्यात असे सांगण्यात आले आहे आणि ते गरजेचे आहे. बाहेर देशातून प्रवास करून आलेले आणि विदेशी नागरिक यांची तपासणी, पाहणी व निगराणी घेतली जाते आहे आणि व्यापक समाजहितासाठी ती गरजेची असल्याने संबंधितांनी त्याला सहकार्य केले पाहिजे पण याबाबतीत प्रशासनाचा अनुभव चांगला नाही. काही पेशंट रुग्णालयातून रात्री पळून घरी गेले अशा वार्ता मती पुंठीत करणाऱया आहेत. इटलीत घरात डांबून घेऊन राष्ट्रगीत गाणारे नागरिक आणि आपल्याकडे रुग्णालयातून पळून जाऊन कुटुंबाला व अन्य माणसांना अडचणीत आणणारे महाभाग यांची तुलना कुणालाही संताप आल्याशिवाय राहणार नाही. कोरोनाचे आरोग्यविषयक परिणाम आणि धास्ती जितकी आहे त्याच्या कित्येकपट अधिक ती अन्य गोष्टीवर झाकोळली आहे. शेअर बाजार विक्रमी कोसळून मोडून पडला आहे. तेलाचे दर कोसळलेले आहेत. सोने दराने नवे उच्चांक केले आहेत. पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. राजकीय कार्यक्रम थांबले आहेत. यात्रा-जत्रावर बंदी आहे. पंढरीची चैत्री वारी, ज्योतिबाचे खेटे आणि बालाजी, शिर्डी, तुळजापूर आदी ठिकाणच्या देवस्थानच्या नैमित्तिक गोष्टीला मर्यादा आल्या आहेत. विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन असो की कार्यालयातील बायोमेट्रिक हजेरी असो लोकलचा प्रवास असो की नोटाची हाताळणी असो सारेच अडचणीचे विषय झाले आहेत. एकीकडे हे आव्हान तर दुसरीकडे अफवा, गैरसमज, सोशल मीडियावरील टिंगल-टवाळी आणि या संकटातही आपली पोळी भाजून घेण्याची वृत्ती सारेच संतापजनक आहे. चीनमध्ये दहा हजार रुग्णांना अवयवदान करण्याची वेळ आली. हे अवयक ठरावीक धर्माच्या लोकांचे घेतले असे तेथे म्हटले जाते आहे. असे नसावे, नसणार पण या संकटातही मास्कचा काळाबाजार करणारे आणि टाकून दिलेले मास्क धुऊन विकणारे महाभाग जसे आढळतात तसे काही जातीयवादी, धर्मवादीही असणार. पण हे प्रमाण नगण्य आहे. अवघे विश्व कोरोना विरोधात कंबर कसून सज्ज झाले आहे व ‘गो बॅक कोरोना’ हा आवाज बुलंद होतो आहे. केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने या संकट काळात निर्धाराने, निश्चयाने पावले टाकली आहेत. लोकांना धीर दिला आहे. जोडीला ही आपत्ती राष्ट्रीय संकट म्हणून जाहीर करून आवश्यक निधी व ठोस पावले उचलली आहेत. भारतीय शास्त्रज्ञ मागे नाहीत. त्यानीही विषाणुचे स्वरुप उलगडण्यात यश मिळवले आहे. कोरोनावर उपचार आहेतच. लवकरच प्रतिबंधात्मक लस तयार होईल पण त्यासाठी काही महिने जातील. या काळात हस्तांदोलन, स्पर्श, शिस्त, आहार, विहार या संदर्भाने नियमाचे पालन केले पाहिजे. आपली भारतीय परंपरा हस्तांदोलन ऐवजी राम राम, नमस्कार शिकवते. रोज अंघोळ, जेवताना व अन्न शिजवताना स्वच्छता व पावित्र्य सांगते. आपल्या प्रथा, परंपरा, नियम यातून जगाने संदेश घ्यावा असे या विषाणुच्या हैदोसानंतर आधोरेखित झाले आहे. नजीकच्या काही काळात आपण आदर्श आचार व आरोग्य शैलीचे पालन करायला हवे. गर्दीची ठिकाणे, अनावश्यक प्रवास, प्रदूषित अन्न, पाणी वर्ज केले पाहिजे. स्वच्छता, संयम व शिस्त याची अंमलबजावणी करताना कुणालाही वाळीत टाकले जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कोरोना समजून घेऊन त्याला पळवून लावूया. त्याच बरोबर नरेंद्र मोदींनी साऱया देशाशी व जगात इतरत्र संपर्क ठेवून कोरोनाशी एकत्रित मुकाबला करण्यासाठी जे प्रयत्न चालवले आहेत त्यांना साथ देऊया. भारताची प्रतिमा त्यातून उजळेल. या निमित्ताने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. जीवघेण्या संसर्गजन्य रोगाच्या आव्हानांना परतून लावण्याची आपली क्षमता तपासून पाहण्याची गरज आहे. करोनाचे कोडे उलगडलेले नाही. अशी आणि काही कोडी असतील त्यावर संशोधन व उपाय शोधले पाहिजेत. त्यातच मानवहित आहे. स्वच्छता आणि चांगल्या आरोग्य सवयी यांची गरज या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे. देशभरच्या आपल्या आरोग्य सुविधा आणि पर्यावरण यांचेही ऑडिट झाले पाहिजे. या संकटात काही संधी शोधून देशाचा तिरंगा उंचावला पाहिजे.
Previous Articleज्ञानात मिळते तेवढे परम सुख अन्य कशातही नाही.
Next Article महीला सक्षमीकरणावर भाष्य ‘ निर्मलःएनरुट ’








