प्रतिनिधी / बेळगाव
भडकल गल्ली येथे गेल्या 40 दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. आधीच कोरोनामुळे नागरिक हैराण असताना आता दूषित पाण्याच्या पुरवठय़ामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. याबाबत पाणीपुरवठा मंडळाला कळवूनदेखील त्यांच्याकडून अद्याप कोणतीच कार्यवाही केली गेली नसल्याने गल्लीतील नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. भडकल गल्लीच्या मागील बाजूस असणाऱया बोळात नळाला दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. पाणी दूषित असल्याने त्याचा वापर होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. काही जणांना नाईलाजास्तव हे पाणी वापरावे लागत आहे. दूषित पाण्यामुळे नागरिक आजारी पडल्यास जबाबदारी पाणीपुरवठा मंडळ घेणार का? असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत. तरे स्वच्छ पाणीपुरवठा करावा अशी मागणी होत आहे.
रस्त्यावरील खड्डे धोकादायक
भडकल गल्लीत आतील बाजूला रस्त्यावरच दोन खड्डे खणले आहेत. रात्रीच्या वेळी हे खड्डे दृष्टीस न पडल्याने लहान मुल, वयस्कर व्यक्ती त्यामध्ये पडत आहेत. काही जणांना दुखापतही झाली आहे. त्यामुळे हे खड्डे त्वरित बुजवावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.









