प्रतिनिधी / कारवार
जिल्हय़ातील भटकळ येथील 26 वर्षीय गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाला धक्का बसला आहे. उपचार घेणाऱया दोन कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या 6 झाली होती. मात्र महिलेला कोरोनाची लागण झाल्यामुळे संख्या 7 वर पोहोचली आहे. या महिलेचा इंजिनिअर असलेला पती दि. 17 मार्च रोजी दुबईहून मुंबईला परतला होता. तेथून तो रेल्वेने भटकळला आला. त्याच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला होता. 31 मार्च रोजी ती व्यक्ती आपल्या गर्भवती पत्नीसह उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली. त्यामुळे रुग्णालयाच्या कर्मचाऱयांनी पतीच्या हातावरील होम क्वारंटाईनचा शिक्का असल्याचे वरिष्ठांना सांगितले. त्यामुळे तातडीने दोघांच्याही स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले. त्यानंतर पतीचा अहवाल निगेटिव्ह तर पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पतीच्या स्वॅबचे नमुने प्रयोग शाळेकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गर्भवती महिलेला उपचारासाठी मणिपाल रुग्णालयात दाखल केले आहे. या महिलेला आणखी दोन मुले असल्याचे समजते..









