बेकायदा वास्तव्य करत असल्याचे उघडकीस : 2014 मध्ये भारतीय व्यक्तीशी विवाहबद्ध
प्रतिनिधी / कारवार
गेल्या सात वर्षांपासून भटकळ येथील नवायीत कॉलनीतील एका घरात बेकायदेशीररीत्या वास्तव्य करून असलेल्या पाकिस्तानी महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. सदर महिलेने खोटय़ा कागदपत्रांच्या आधारे मिळविलेले रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड जप्त करण्यात आल्याची माहिती कारवार जिल्हा पोलीसप्रमुख शिवप्रकाश देवराजू यांनी दिली. ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव खतीजा मेहरीन आहे. जावेद मोहिद्दिन रुक्सुद्दिन याच्या निवासस्थानी ती राहत होती. तिला तीन मुले असल्याचे सांगण्यात आले.
भटकळ येथील नवायीत कॉलनीतील जावेद मोहिद्दिन रुक्सुद्दिन याच्याशी पाकिस्तानचे नागरिकत्व असलेल्या महिलेचा विवाह 2014 मध्ये दुबई मुक्कामी झाला. विवाहानंतर सदर महिला व्हिजिटिंग व्हिसाच्या आधारे तीन महिने भटकळ येथे वास्तव्य करून होती. व्हिसाचा कालावधी संपल्यानंतर ती मायदेशी परतली होती.
चोरटय़ा मार्गाने भटकळला परतली
2015 च्या सुरुवातीला सदर महिला चोरटय़ा मार्गाने बेकायदेशीररीत्या भटकळला परतली. याची माहिती गुप्तचर खात्याला मिळाली होती. सदर महिला बेकायदेशीररीत्या भारतात (भटकळमध्ये) वास्तव्य करून असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस व अन्य तपास यंत्रणांच्या साहाय्याने शोध घेण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू होता.
न्यायालयीन कोठडीत रवानगी
सदर महिलेला ताब्यात घेऊन तिच्यावर विदेशी कायदा उल्लंघन आणि आयपीसीअंतर्गत प्रकरण दाखल करून स्थानिक न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. सदर महिलेचा शोध घेण्यासाठी कारवार जिल्हा पोलीसप्रमुख शिवप्रकाश देवराजू, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख बदीनाथ, भटकळचे डीवायएसपी बिळीयप्पा के. यु., भटकळचे मंडळ पोलीस निरीक्षक दिवाकर पी. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भटकळ शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका बी. सुमा यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाची रचना करण्यात आली होती. कारवाईत भटकळ नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी नारायण नाईक, मगदूम फत्तेखान, लोकप्पा पत्री आणि भटकळ ग्रामीण पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचारी हिना एम. सहभागी झाल्या होत्या. भटकळ नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, वेगवेगळय़ा कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱया भटकळमध्ये गेल्या सात वर्षांपासून बेकायदेशीररीत्या वास्तव्य करून असलेल्या पाकिस्तानी (नागरिकत्व) महिलेला ताब्यात घेण्यात आल्याने संवेदनशील भटकळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.









