बेंगळूर/प्रतिनिधी
शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर सडकून टीका केलीय. तसेच राज्य सरकार केवळ भजे खायचे आणि गुलाबजाम खायचे अशा घात प्रवृत्तीचे असल्याचा आरोप केला.
विनायक मेटे मराठा आरक्षणाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत. ते वारंवार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर सडकून टीकाकरत आले आहेत. आताही त्यांनी आरक्षणावरून राज्य सरकार केवळ भजे खायचे आणि गुलाबजाम खायचे अशा घात प्रवृत्तीचे असल्याचा आरोप केला. आरक्षण कुणाला द्यायचं याचे अधिकार आता राज्यांना मिळाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे बोट दाखवू नये, असंही मत त्यांनी व्यक्त केलं. विशेष म्हणजे मेटेंनी मराठा आंदोलनात सहभागी होणाऱ्या राज्य सरकारच्या मंत्र्यांवर निशाणा साधला.
विनायक मेटे म्हणाले, “मोदी सरकारचं मनःपुर्वक अभिनंदन आणि आभार. केंद्र सरकारने २०१८ रोजी १०२ वी घटना दुरूस्ती केली, तेव्हाच हे अधिकार अबाधित होते. अनेकांचा गैरसमज झाला, चुकीचा मेसेज पसरवला. सर्वोच्च न्यायालयानेही टिप्पणी केली. राज्य सरकारच्या दुर्लक्षपणाचा मराठा समाजाला फटका बसला. आरक्षण रद्द झालं. आता राज्याला अधिकार मिळाले आहेत. राज्य सरकार आत्ता केंद्राकडे बोट दाखवू शकत नाही. आरक्षण कुणाला द्यायचं याचा सर्वस्वी अधिकार राज्यांना असेल.” असे ते म्हणाले.
विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात “इंद्रा सहानी केसमध्ये या सगळ्या गोष्टी आल्या आहेत. आरक्षणासाठी ५० टक्क्यांपेक्षा अधिक मर्यादा वाढली पाहिजे. ही जबाबदारी जशी केंद्राची तशी राज्याचीही आहे. आरक्षणासाठी राज्य काही करत नाही, केंद्राला दोष देत आहे. ‘आपण भजे खायचे, गुलाबजाम खायचे, ही राज्याची घातक प्रवृत्ती’, असा आरोप केला.