निवतीतील महापुरुष मंडळाचे आगळे-वेगळे सादरीकरण
वारकरी भजनातून देताहेत व्यायामाचाही संदेश
प्रमोद ठाकुर / म्हापण:
चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम, योगाची गरज निर्माण झाली आहे. यासाठी व्यायामशाळा व अन्य ठिकाणी गेलेच पाहिजे, असे नाही. पारंपरिक वारकरी संप्रदायाच्या विविधांगी भजनातून संपूर्ण शरीराचा व्यायाम करता येतो, हा संदेश वेंगुर्ले तालुक्यातील निवती येथील महापुरुष वारकरी संप्रदाय भजन मंडळाचे बुवा ज्ञानेश्वर हरिश्चंद्र केळुसकर व त्यांचे सहकारी आपल्या वारकरी भजन मालेतून लोकांपर्यंत पोहचवित आहेत.
निवती येथील हे भजन मंडळ वारकरी संप्रदायाच्या पठडीत बसतील, शोभतील, असे व्यायाम प्रकार भजनातून सादर करीत आहेत. नाथ संतांचा हा वसा पुढे चालविण्यासाठी संतांचा महिमा भजनातून सादर करतो, असे बुवा केळुसकर सांगतात. भगवंताची भक्ती करणे. ती करताना भागवत मानवता व भागवत धर्म जोपासणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. आधुनिक जमान्याला आवडणारे आणि त्यातून भजनांची आवड सर्वसामान्यांना निर्माण व्हावी, यासाठी आमचा प्रयत्न असतो. ज्ञान-भक्ती व त्यातून व्यायाम करून आरोग्य उत्तम कसे राखायचे, याबाबत आम्ही संदेश देतो आणि सर्वसामान्य भविष्यात भगवंताची भक्ती करताना आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी वारकरी भजन आत्मसात करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भाविकही भारावले
म्हापण-खालचीवाडी येथील दत्त मंदिरात गुरुप्रतिपदा उत्सवानिमित्त या वारकरी भजन मंडळाने आपली भजन सेवा सादर केली. आगळे-वेगळे व व्यायामाचा संदेश देणारे भजन पाहून स्थानिकांसह पुणे-गोवा येथून आलेले भाविकही भारावले.
पंचवीस वर्षांपूर्वीपासून सुरुवात
पंचवीस वर्षांपूर्वीपासून निवती वाडीत वारकरी भजनाला सुरुवात झाली. मुरारी सारंग, उत्तम पडते, चंद्रकांत नागोळकर, रामकृष्ण केळुसकर व सहकाऱयांनी, भजनप्रेमींनी वारकरी भजन सेवेला सुरुवात केली. वेंगुर्ले येथील वारकरी संप्रदायातील सावळाराम कुर्ले, भाऊ सातार्डेकर, भाऊ डिचोलकर यांनी वारकरी भजन लोकांना कसे आवडेल, त्यासाठी भगवंत सेवा करताना सादरीकरण कसे करावे, यासाठीचे निवतीमधील भजनप्रेमींना मार्गदर्शन उपयुक्त असे ठरले.
लहान मुलांचाही सहभाग
या वारकरी भजन मंडळाचे बुवा म्हणून ज्ञानेश्वर केळुसकर सध्या कार्यरत आहेत. सुमारे पंचवीसपेक्षा जास्त तरुण या भजनसेवेत कार्यरत असतात. तरुणांबरोबर नवीन पिढीला याची आवड निर्माण व्हावी, यासाठी लहान मुलांनाही सहभागी करून घेत त्यांना मार्गदर्शन केले जाते.
जागीच खिळवून ठेवण्याची ताकद
निवती येथील या भजन मंडळाचे सादरीकरण त्यांच्या प्रत्येक कृतीतून उपस्थितांना जागीच खिळवून ठेवते. पांढरा पोशाख, टाळ व मृदंग यांचे शिस्तबद्ध वादन, एकसंध ताल व नृत्य यामुळे भजनप्रेमींची वाहवा मिळवितात. बुवा केळुसकर यांच्यासमवेत मृदंगमणी व गायक दत्तगुरु पडते, नरेंद्र सारंग, लक्ष्मण पडते, प्रज्योत मेतर, विशाल सारंग, सर्वेश केळुसकर या प्रमुख गायकांबरोबर काही नवोदित गायकही या भजन सेवेची उंची वाढवित आहेत.
आधुनिक नृत्यांची जोड
वारकरी भजनाकडे भजनप्रेमी शिवाय इतरांचाही कल वाढावा, भगवंतांचे नामस्मरण त्यांनी करावे, यासाठी गेल्या पाच वर्षांपासून वारकरी संप्रदायातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नवीनप्रकारे नृत्य, पर्यायाने चांगला व्यायाम कसा होईल, असे नृत्यप्रकार समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे आम्हा सर्व भजनी कलाकारांचा चांगला व्यायाम होतोच. लोकांना भजन आवडते. भजनाचा प्रचार व प्रसारही होतो, असे केळुसकर सांगतात.
अन्य व्यायाम करण्याची गरज नाही
वारकरी भजनातून हात-पाय, मान, कंबर, गुडघे, पाठीचे सर्व व्यायाम शिस्तबद्ध पद्धतीने होतात. टाळ वाजवून नाचताना त्यात भक्ती व शिस्त असल्याने असे व्यायाम परिणामकारक ठरतात. त्यामुळे अशा पद्धतीने वारकरी भजनाची मांडणी केल्यास अन्य कुठेही व्यायामाला जाण्याची गरज नाही, हे स्पष्ट होते. ‘भजनातून व्यायाम’ हा संदेश यानिमित्ताने देण्यात येतो.
पंढरीचे वारकरीच साधू शकतात आगळी किमया!
म्हापण येथील अजित ठाकुर व अभय ठाकुर यांनी वारकरी सेवा सादर केली होती. त्यावेळी पुणे येथून आलेल्या कीर्तनकारांनी निवती येथील या भजनी मेळय़ाचे कौतुक पेले. पंढरीचे वारकरीच ही आगळी किमया साधू शकतात, असे सांगितले.
‘विठोबा-रखुमाई-ग्यानबा-तुकाराम’ने व्यायामात तल्लीन
वारकरी भजन सांगतेकडे वळते, तेव्हा संतपद घेतले जाते. तेव्हा ‘विठोबा-रखुमाई’चा जयघोष केला जातो. त्यानंतर मागणी दानाचे अभंग सादर केले जातात. त्यावेळी ‘ग्यानबा-तुकाराम’चा अखंड जयघोष करून वारकरी तल्लीन होऊन नाचतात. या तल्लीन होऊन नाचण्याने शरीराला चांगला व्यायाम मिळतो आणि त्यातूनच चांगले आरोग्यही मिळते. सिंधुदुर्गात आता अशी वारकरी भजने मोठय़ा प्रमाणात व्हावीत, अशी अपेक्षा आहे.









