चंदीगड
पंजाबमध्ये खासदार भगवंत मान हे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात. पक्षाने भगवंत मान यांचा चेहरा पुढे करत पंजाब विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. पक्ष याची घोषणा करण्यासाठी योग्य वेळेची मुदत करत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप संयोजक अरविंद केजरीवाल हे कोरोनाबाधित झाल्याने ही घोषणा काही दिवसांनी केली जाणार आहे. आप खासदार भगवंत यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार करण्यासाठी पक्षाच्या कार्यकारिणीत सहमती झाली आहे.
2017 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीतही आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव चर्चेत होते. परंतु तेव्हा पक्षाने मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा केली नव्हती. आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान हे प्रसिद्ध विनोदवीर आहेत. पंजाबच्या संगरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी सलग दोनवेळा विजय मिळविला आहे. मान यांनी स्वतःच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात मनप्रीत सिंह बादल यांच्या पंजाब पीपल्स पार्टीमधून केली होती. परंतु नंतर ते आम आदमी पक्षात सामील झाले.









