ज्या प्रमाणे सुग्रास जेवणाऱयाला पुष्टी, तुष्टी आणि क्षुधानाश ही एकदम प्राप्त होतात त्याप्रमाणे शुद्ध अंतःकरणाने भगवंतभक्ती करणाऱयाला भक्ती, विरक्ती आणि अनुभवप्राप्ती एकदमच मिळतात. भक्ती म्हणजे प्राणिमात्रांच्या ठायी प्रेमभावना, मी आणि माझे अशी भावना नष्ट होणे म्हणजे विरक्ती आणि अनुभवप्राप्ती म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची भेट. यासाठी ज्याला स्वतःच्या हिताची लालसा असेल त्याने अतिशय आदराने हरिभक्ती करावी आणि श्रे÷ अशा परमपदाचा लाभ घ्यावा. असे पूर्णप्राप्ती झालेले भगवंतभक्त जगामध्ये कसकसे वागतात ते पुढे पाहू. विधिपूर्वक पूजा करत असताना, कीर्तन करत असताना, ते ऐकत असताना किंवा नामस्मरण करत असताना जो तल्लीन होतो त्याला पूर्वप्राप्ती साध्य होते असे म्हणतात. अशी पूर्वप्राप्ती साध्य झाली की तेथे वैराग्य आपोआपच येते. वैराग्य म्हणजे अमुक एक आपल्याला हवे आहे किंवा नको असे दोन्हीही जेव्हा वाटत नाही अशी मनाची अवस्था. जेव्हा भक्ती आणि विरक्ती एकत्र येतात तेव्हा भक्ताला पूर्णप्राप्ती होते म्हणजेच भगवंतप्राप्ती होते.
थोडक्मयात भगवंत भजनात तल्लीन, विरागी झालेल्याना देव भेटतो. त्यासाठी हरिभक्ती हे उत्तम अंजन आहे. हे डोळय़ात घातल्यास भजनरुप महायोगाने भगवंतस्वरूपाचा ठेवा भक्ताच्या हाताला लागतो, म्हणून भगवंत भक्त धन्य होत. ते सर्व व्यवहार करत असतात पण विषयाविषयी विरक्त असतात. अशा प्रकारे पूर्णप्राप्ती करून घेतलेले भक्त कसे वागतात ते सांगताना नाथमहाराज म्हणतात, ‘आतापर्यंत कवी नावाचे अर्षभ माहिती देत होते. या वेळी हरि नाव असलेले अर्षभ उत्तर देत आहेत, त्यांच्या उत्तराप्रमाणे अशा भक्तांना सगळीकडे भगवंतच दिसत असतो. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन वागण्यामध्ये मान, अपमान, नफा, तोटा या वागण्यांना स्थान नसते. साहजिकच त्यांचे वागणे बोलणे चारचौघांसारखे असत नाही. त्यांना अवलिया म्हणणे योग्य ठरेल. याबाबतीत तुकाराम महाराजांचे वर्तन सर्वाना माहीत आहेच. हे भक्तांचे शुद्ध लक्षण होय. त्यांची विचारसरणी अशी असते की, सर्व प्राणिमात्रांमध्ये भगवंत आहे. त्याही पुढे जाऊन सर्व प्राणिमात्र भगवंताचाच अंश आहेत आणि हा जो भगवंत आहे, तो मीच आहे अशी त्यांची पक्की धारणा असते आणि यात कुठेही आत्मप्रौढी नसते कारण ही त्याच्या मनाची सहजावस्था होय. असा भक्त ज्याला सगळय़ांच्यातला भगवंत स्पष्ट दिसत असतो त्याला उत्तमोत्वाचा मान मिळून श्रे÷ अवतार मानतात. भगवंत त्याला अग्रगण्य योगी, ज्ञानशिरोमणी अशी विशेषणे देऊन गौरवतात.
श्रीगोंदवलेकर महाराज म्हणायचे की मला तुम्ही सगळे रामरूप दिसता. यातील गूढ असे की, ते स्वतः भगवंतानी सांगितलेली वरील विशेषणे बाळगून होते. अशांच्या मनामध्ये विषयसेवन करत असताना सुखदुःखाचे विचार येत नाहीत. मग ते विषयसेवन का करत असतात, हा प्रश्न येतो. तर त्याचे उत्तर असे की, प्रारब्ध कर्म अतिशय बलवान असते ते भक्तांकडून विषयसेवन करवते.
क्रमशः







