भगवान श्रीकृष्णाने सत्राजिताला त्याच्याकडे असलेला स्यमंतकमणी हा यादवांचे राजे उग्रसेन महाराज यांचेकडे द्यायला सांगितला, याचे कारण काय असावे? सर्वात प्रथम आपण हे लक्षात घ्यायला हवे की स्यमंतकमणी ही एक सामान्य व केवळ मूल्यवान वस्तू नसून ती एक शक्ती आहे. हा मणी आपल्याजवळ असावा असे प्रत्येक व्यक्तीला वाटणे साहजिक आहे. मग, श्रीकृष्णाला हा मणी आपल्याजवळ असावा असा स्वार्थ होता काय? श्रीकृष्णाने हा मणी स्वतःसाठी मागितला नाही तर तो राजा उग्रसेन यांचेकडे सत्राजिताने द्यावा असे सांगितले. अर्थात श्रीकृष्णाला स्वार्थी म्हणता यायचे नाही. तरी कृष्णाने असे सांगितले यालाही काय कारण असावे, याचा आपण विचार करतो आहोत. एखादी अमूल्य वस्तू ही केवळ मिळाली, लाभली म्हणून ती सांभाळता येतेच असे नाही. एखादी वस्तू, शक्ती, सत्ता मिळणे याला योग असे म्हणतात तर ती सांभाळणे याला क्षेम असे म्हणतात. सर्वसाधारणपणे योगापेक्षा क्षेम अवघड आहे असे मानले जाते. रावणाने उग्र तप करून भगवान शंकराकडून त्याचे आत्मलिंग मिळवले पण ते त्याला सांभाळता आले नाही. पांडवांनी इंद्रप्रस्थाचे राज्य मिळवले पण युधि÷िराने द्युतात ते गमावले. कर्णाने परशुरामाकडून ब्रह्मास्त्र मिळवले पण त्यानेच शाप दिल्याने त्याचा कर्णाला युद्धात उपयोग करता आला नाही. आपण अनेकदा असे पाहतो की लोक बक्कळ पैसा कमावतात पण तो त्यांना राखता येत नाही. सत्ता मिळते पण टिकवता येत नाही. आपण मिळवलेली शक्ती भस्मासूराप्रमाणे आपलाच विनाश करते. एखादी मूल्यवान वस्तू, शक्ती अगर सत्ता मिळाल्यावर ती सांभाळण्यासाठी केवळ बल, सामर्थ्य पुरेसे नसते तर त्यासाठी विवेक, चातुर्य व अखंड सावधानता ही देखील लागते. सत्राजिताजवळ हा विवेक व सावधानता नाही हे भगवान जाणून होते. याखेरीज आपण जाणले पाहिजे की या विश्वातील प्रत्येक वस्तूचा खरा मालक भगवंतच असून त्याचीच सत्ता सर्वांवर चालते. अगदी आपल्या अमूल्य देहावरच नव्हे तर आपल्या श्वासावरही आपली सत्ता नाही.
आपल्याला जे लाभले आहे त्याचा उपयोग केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी न करता जनता जनार्दनाच्या सेवेसाठी करावा. पण सत्राजिताने तो स्यमंतकमणी स्वतःजवळच ठेवून घेतला. त्यावेळी त्याने हाही विचार केला नाही की आपण भगवंताच्या आज्ञेचे उल्लंघन करीत आहोत. या त्याच्या वर्तनाचा परिणाम काय झाला हे महामुनी शुकदेव पुढे सांगतात.
अर्थकामुक सत्राजित । त्यासी याचितां उग्रसेनार्थ ।
मनि नेदूनि निघाला त्वरित । अवज्ञा तर्कित होत्साता । म्यां भंगिली भगवद्याञ्चा । लोभ धरिला स्यमंतकाचा । भिडे घालिती तैं सर्वांचा । मी विरोधी होईन । विरोध पडतां समर्थांसीं । मग वसावें कवणे देशीं । यालागीं मणि हा प्रसेनासी । देऊनि निमित्त वारिलें । स्वर्चित मणि जिये स्थानीं । तेथ सर्वही कल्याणखाणी । विपरीत फळाची जे करणी । तेही श्रवणीं अवधारा । कोणे एके दुर्दैवदिवसीं । कंठीं बांधोनि स्यमंतकासी । प्रसेन निघाला पारधीसी । अनुगवर्गेंसीं विराजित ।
Ad. देवदत्त परुळेकर








