(अध्याय चौथा)
ईश्वराची तैतरीय उपनिषदात अशी व्याख्या केलेली आहे की, सत्यम, ज्ञानम, अनंतम असा जो आहे तो ईश्वर होय. यातील अनंत शब्द स्पष्ट करतो की, ईश्वराला अंत म्हणजे शेवट नाही. तो देश कालातीत असून चिरंतन आहे. दुसरे म्हणजे समोर दिसणाऱया वस्तू, आपल्या समोर आहेत याचाच अर्थ त्या इतर ठिकाणी नाहीत. निराकार रूपात तो सर्वत्र हजर असतो आणि सर्व काळ सर्व ठिकाणी त्याची सत्ता चालते. तसेच त्याचे अस्तित्व काल होते, आज आहे आणि उद्याही राहील हेही सत्य आहे. असणेपणा हा त्याचा आणखी एक गुण असून प्रत्येक वस्तूत तो असल्याने जरी ती वस्तू नष्ट झाली तरी ती वस्तू ज्या मूळ घटकांपासून तयार झाली आहे ते घटक या ना त्या रूपात शाबूत असतात. त्यामुळे वस्तू नष्ट झाली तरी त्या वस्तूच्या घटकात ईश्वराचे अस्तित्व चिरंतन असते. बऱयाचवेळा भगवंत आणि ईश्वर यांच्यामधील फरक आपल्याला माहीत नसतो. ईश्वर जेव्हा स्वतः मायेचे पांघरूण घेऊन अवतार घेतात, सगुण रूपात प्रकटतात तेव्हा ते भगवंत असतात. अवतार घेतल्याशिवाय, म्हणजे सगुण रूपात प्रकटल्याशिवाय त्यांना साधूंचे रक्षण आणि धर्माची पुनःस्थापना करता येत नाही. ते कार्य संपल्यावर ते पुन्हा ईश्वर होतात. अशा ईश्वराने अवतार घेतला की त्यांना भगवंत म्हणतात नुसत्या नेत्र कटाक्षाने भगवंत सर्वांचे नियमन करत असतात. हरिनामानेच भक्तांचे संरक्षण होत असते. भक्तांचा कैवार घेऊन देव अनेक अवतार घेतात. असे अनेक अवतार घेऊन भगवंतांनी भक्तांचा कैवार कसा घेतला त्याची अति अद्भुत माहिती आपण घेत आहोत. इंद्राने वृत्राला मारल्याने ब्राह्महत्येचे पाप लागले होते. त्यामुळे तो नरकात खितपत पडला होता. कृपाळू अनंताने अवतार घेऊन इंद्राला मुक्त केले.
मुर नावाच्या दैत्याने देवांचा पराभव करून, देवस्त्रियांना बंदिवासात ठेवले होते. श्रीहरीने मुर दैत्याचा वध करून त्यांची सुटका केली म्हणून श्रीहरीला ‘मुरारी’ हे नाव मिळाले. प्रल्हादाला छळणाऱया हिरण्यकश्यपूचा ‘नृसिंहवतार’ घेऊन हरीने वध केला. मोहिनी अवतारात हरीने देवांना अमृत आणि दैत्याना मद्य अशी वाटणी केली. भक्तांना रात्रंदिवस सहाय्य करणाऱया नारायणाने द्वारकेत कुशाचे निर्दालन करून लवणासुराला मारून कुमार रूपाने अवतार धारण केला. याप्रमाणे आपल्या भक्तांचा कैवारी श्रीहरी, स्वतः नाना प्रकारचे अवतार घेतो. नंतर तो देवाधिदेव स्वतः परशुराम झाला. त्याने 21 वेळा क्षत्रियांचे निर्दालन केले. त्यानंतर सर्व अवतारांचे मूळ पीठ ज्याची विरवृत्ती अत्यंत उज्ज्वल तो सर्व अवतारांमध्ये श्रे÷ व अत्यंत समर्थ असा ‘श्रीराम’ झाला. त्याच्या नावाने सर्व पातके जळून जातात. नामस्मरण करणाऱयाच्या चरणी यमसुद्धा लीन होतो. नामाने कळी काळही थरथर कापू लागतो. जन्म मृत्यूची येरझार थांबते. येथपर्यंतच्या अवतारांची माहिती जनक राजाला जयंती नंदन द्रुमिल यांनी दिली. आता ते भगवंतांच्या पुढील अवतारांची माहिती देत आहेत. ती आपण उद्या पाहू ….
क्रमशः







