वार्ताहर/ संगमेश्वर
भक्ष्याचा पाठलाग करताना बिबटय़ा विहीरीत पडल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील देवधामापूर पाष्टेवाडी येथे रविवारी रात्री घडली. सोमवारी सकाळी विहिरीतून आवाज येत असल्याने गणपत पाष्टे यांनी डोकावून पाहिले असता विहिरीत बिबटय़ा पडल्याचे त्यांना दिसून आले.
देवधामापूर पाष्टेवाडी येथे असलेल्या विहिरीला साडेतीन फूटाचा कठडा आहे. बिबटय़ाने पक्षाचा पाठलाग करीत असताना जाळीवर उडी मारल्याने जाळी तुटून तो 25 फूट विहीरीत कोसळला. सोमवारी सकाळी ही घटना लक्षात येताच संतोष पाल्ये यांनी देवरुख वनविभागाला याबाबतची माहिती दिली.
चिपळुणचे विभागीय वनअधिकारी र. शि. भवर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेत्र वनधिकारी प्रियंका लगड, वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक बाबा गावडे, शर्वरी कदम, मिलिंद डाफळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विहिरीत पिंजरा सोडून बिबटय़ाचे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर बिबटय़ाला पकडण्यात यश आले आहे.
पशुवैद्यकिय अधिकारी कांबळे यांनी देवरुख येथे बिबटय़ाची तपासणी केली. हा नर बिबटय़ा पाच वर्षाचा आहे. सह्याद्रीनगर येथे बिबटय़ा पकडून आणल्याची खबर मिळताच त्याला पहाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या बिबटय़ाला वनविभागाने सुरक्षीत अधिवासात सोडले आहे.









