अध्याय एकोणतिसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा ज्याला सगळीकडे माझेच दर्शन होत असते त्याला वेद आणि शास्त्रार्थ जाणून घेण्याची आवश्यकता रहात नाही कारण वेद आणि शास्त्रार्थ ह्यांचा अभ्यास करून माझे दर्शन सगळीकडे कसे होईल हेच साधकाने जाणून घ्यायचे असते. माझ्या अनन्य भक्ताला हे आधीच साध्य झालेले असल्याने वेद आणि शास्त्रs त्याच्या दृष्टीने निरुपयोगी होतात. केवळ ब्रह्म सत्य असून जग मिथ्या आहे म्हणजे समोर दिसत असलं तरी निरर्थक आहे. ह्याचाच अर्थ असा की, ब्रह्म हेच आत्मा किंवा जीव आहे आणि ह्यापलीकडे कशाचेही अस्तित्व नाही. ब्रह्म सत्य आहे हे पचनी पडल्यावर भक्ताच्या दृष्टीने ते असले काय आणि नसले काय काहीच फरक पडत नाही. समोर दिसणारा संसार खरा वाटत असला तरी निरर्थक आहे म्हणजे मिथ्या आहे हे लक्षात आले की, साधक त्याकडे दुर्लक्ष करतो. त्याच्या लेखी लोकांच्या गुणदोषांना काहीच महत्त्व रहात नाही. त्यामुळे त्याचे त्याकडे आपोआपच दुर्लक्ष होते. त्यासाठी माझे भजन करणे हेच खरे साधन आहे. व्रत, तप, दान, योग, याग, ध्यान, वेदशास्त्राचे ज्ञान इत्यादि कितीही साधने केली तरी ती माझ्या भक्तीच्या साधनाशी स्पर्धा करू शकत नाहीत. परंतु हे लक्षात न आलेले साधक नाना साधने करण्याच्या खटपटीत राहून थकून जातात पण त्या साधनांना माझ्यावरील भक्ताच्या प्रेमाची सर येत नाही. जेव्हा त्यांची माझ्या भक्ताशी गाठ पडते तेव्हाच त्यांना माझ्या भक्तीचे महात्म्य निश्चित लाभते. उद्धवा माझी प्राप्ती केवळ अभेदभक्ती केल्याने होते हे लक्षात ठेव. सर्व भुतांच्या ठिकाणी भगवद्भाव पाहणारा भक्त सर्वांना दंडवत घालत असतो. सर्वसाधारणपणे आपल्या जवळच्या, आवडणाऱ्या व्यक्तीला नमस्कार करताना माणसाला आनंद वाटतो तर त्याउलट वाईट कर्मे करणारी व्यक्ती समोर आली तर मनात त्या व्यक्तीबद्दल द्वेष दाटून येतो. पण माझ्या भक्ताची गोष्टच वेगळी असते. त्याला सर्वजण भगवदस्वरूपच वाटत असल्याने त्याच्या मनात समोरच्या व्यक्तीबद्दल आवड निवड, बरे वाईटपणा असा काही भावच नसतो. त्यामुळे समोर कोणतीही व्यक्ती आली तरी त्याच्यात माझेच रूप बघून तो त्याला दंडवत घालत असतो. त्याच्या मनात परिपूर्ण ब्रह्मभाव दाटून आला असल्याने तो कुणाबद्दल कटू भाव बाळगत नसतो. ह्यालाच मानसिकरित्या केलेले माझे भजन असे म्हणतात. समोर दिसणाऱ्या व्यक्तीला तो परिपूर्ण भगवंताचे रूप मानत असतो. त्यामुळे तो कुणाशीही कठोरपणे वागत नाही की त्याला टाकून बोलत नाही. अगदी स्वत:चे प्राण जायची वेळ आली तरी समोर दिसणाऱ्या भूतांचे गुणदोष तो बोलून दाखवत नाही. तो करत असलेल्या देहाच्या हालचालीही इतरांच्यावर उपकार व्हावा ह्या दृष्टीने करत असतो. एखाद्या गोष्टीत स्वत:चे नुकसान होत असेल तर सामान्य मनुष्य दुसऱ्याचा गैरफायदा घेण्यास मागेपुढे पहात नाही कारण त्याला स्वत:चा स्वार्थ साधायचा असतो पण माझा भक्त स्वत:चे नुकसान टाळण्यासाठी इतरांचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर अपकार करत नाही. एव्हढेच नव्हे तर तो स्वत: नुकसान सहन करतो आणि ज्यांच्या अपकारांमुळे त्याचे नुकसान झालेले असते, त्यांच्याबद्दल मनात कोणतीही कटुता न ठेवता अपकार करणाऱ्यावरही उपकार करत असतो. अशा विचाराने जो शरीराच्या हालचाली करत असतो तो माझे कायिक भजन करत असतो असे समज. ह्याप्रमाणे शरीराने दुसऱ्यावर उपकार होतील अशा हालचाली करणे, कटू, तिरकस बोलून कुणाला न दुखावणे आणि कुणाचे वाईट व्हावे असे कधीही मनात न आणणे ह्याप्रमाणे काया, वाचा, मनाने जो माझे भजन करत असतो आणि सर्वांच्यात माझे स्वरूप पहात असतो. हेच माझी भक्ती करण्याचे सर्वश्रेष्ठ साधन आहे हे माझे सज्ञान भक्त जाणून असतात.
क्रमश:








