गेल्याच आठवडय़ात शिवजयंती आणि तुकाराम बीज उत्सव साजरा करण्यात आला. या दोन्ही महापुरुषांनी 16 व्या शतकात एकमेकांच्या प्रेरणेने केवळ राष्ट्रच उभे केले नाही तर त्याकाळी धर्मावर आलेले संकटही दूर करून समाजाला धर्म पाळण्याची व्यवस्था निर्माण करून दिली. वैदिक संस्कृतीनुसार ब्राह्मण गीता भागवत शास्त्राच्या आधारे धर्माचे पालन कसे करायचे हे स्वतःच्या उदाहरणावरून समाजाला शिकवतो आणि क्षत्रिय त्यांच्या आदेशानुसार राज्य करतो व आपल्या शासनाखालील समाजाला धर्म पाळण्याची सुविधा निर्माण करून देतो आणि शत्रूपासून त्यांचे रक्षण करतो. येथे तुकाराम महाराज परिपूर्ण ब्राह्मण आणि छत्रपती शिवाजी महाराज हे परिपूर्ण क्षत्रिय कसे असावेत याचे उदाहरण जगासमोर ठेवीत आहेत. हाच आहे भक्ती शक्ती संगम.
संत तुकारामांनी लिहिलेले अभंग तेरा दिवस पाण्यात राहूनही जसेच्या तसे भगवत कृपेने बाहेर आले ही विस्मयजनक बातमी शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली. असे हरिभक्त संत आपल्या राज्यामध्ये राहतात याचा त्यांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी ठरविले की तुकाराम महाराजांना आपल्याकडे बोलावून त्यांच्या मुखातून कीर्तन प्रवचन ऐकावे. शिवाजी महाराजांनी सन्मानाने काही मौल्यवान भेटवस्तू दूताकडून पाठवून तुकाराम महाराजांना आमंत्रण पाठविले. त्यावेळी तुकाराम महाराजांनी ‘मान, दंभ, प्रति÷ा ही तर मला डुकराच्या वि÷sप्रमाणे वाटतात’ अशा आशयाचे अभंग निरोप म्हणून आणि मौल्यवान भेटवस्तू राजांना परत पाठविल्या. शिवाजी महाराजांनी ते अभंग वाचले आणि त्या अभंगातून संत तुकारामांचा निरपेक्ष भाव आणि भगवद्भक्ती पाहून अगोदरच असलेला त्यांच्याबद्दलचा आदर आणखीनच वृद्धिंगत झाला. त्यांनी ठरविले की स्वतःच जाऊन तुकारामांसारख्या महापुरुषाची भेट घ्यावी. आपल्याबरोबर रेशमी वस्त्रे, सोन्याचे अलंकार, पूजेचे साहित्य, सोन्याची नाणी इत्यादी मौल्यवान वस्तू भेट देण्यासाठी घेऊन शिवाजीराजे आपल्या काही प्रधान मंत्र्यांसोबत त्यावेळी लोहगाव, पुणे येथे वास्तव्यास असलेल्या तुकारामांना भेटण्यास आले. लोहगाव येथे आल्यावर त्यांनी पहिले की गावातील प्रत्येक व्यक्तीच्या मुखामध्ये तुकारामांचे विठ्ठल भक्तिपर अभंग व हरिनाम आहे. सर्वजण एकमेकांशी प्रेमाने व आदराने व्यवहार करीत आहेत आणि भगवद्भक्तीचा आनंद घेत आहेत. आतापर्यंत तुकारामांबद्दल जे काही ऐकले त्याचा स्वतः राजे प्रत्यक्ष अनुभव घेत होते. त्यानंतर शिवाजीराजे जेथे तुकारामांचा मुक्काम होता तिथे आले आणि राजासहित सर्वांनी तुकारामांना साष्टांग दंडवत केला, राजांनी स्वहस्ते तुकारामांच्या कपाळावर गंध लावून गळय़ाभोवती तुळशी आणि सुगंधित फुलांचा हार घातला आणि सन्मानपूर्वक राजांनी स्वतःबरोबर आणलेल्या मौल्यवान वस्तू आणि सुवर्णमुद्रा तुकारामांसमोर ठेवल्या. ते सर्व राजद्रव्य पाहून वैराग्यमूर्ती तुकारामांना किळस आला. तुकाराममहाराज शिवाजीराजांना म्हणाले. काय दिला ठेवा । आम्हा विठ्ठलाची व्हावा ।।1।। तुम्ही कळलेती उदार । साटी परिसाची गार ।।2।। जीव देता तरी । वचना नये एक सरी ।।3।। गोमांसा समान । तुका म्हणे आम्हा धन ।।4।। अर्थात अहो शिवराय, तुम्ही आम्हाला ऐश्वर्य का देत आहात? आम्हाला फक्त विठ्ठलच हवा. आपण उदार वृत्तीचे आहात हे कळले, पण परिस घेऊन गारगोटी देण्यात कसली उदारता? विठ्ठल कृपेने जे शब्द आमच्या मुखातून बाहेर पडतात, त्याची सर एखाद्याने प्राण दिला तरी कधी यायची नाही. धन हे आम्हाला गोमांसाप्रमाणे वाटते. त्यानंतर खरा हरिभक्त काय केल्याने प्रसन्न आणि संतुष्ट होतो आणि राजा आणि समाजाकडून काय अपेक्षा करतो याबद्दल सांगताना तुकाराम महाराज शिवरायांना म्हणतात, आम्ही तेणे सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ।।1।। तुमचे येर वित्त धन । जे मज मृतिके समान ।।2।। कंठी मिरवा तुळशी । व्रत करा एकादशी ।।3।। म्हणवा हरीचे दास । तुका म्हणे मज हे आस ।।4।। अर्थात अहो शिवराय, तुम्ही मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणजे आम्ही सुखी होऊ, अन्यथा तुमची धनसंपत्ती आम्हाला मातीमोल वाटते. गळय़ामध्ये तुळशीमाळ घालून ते भूषण लोकात मिरवा, आणि त्याचबरोबर एकादशी व्रत पालन करा. अशा प्रकारे आचरण करून स्वतःला हरीचे दास म्हणूवून घ्या, हीच माझी एकमेव इच्छा आहे. तुकारामांचे हे शब्द ऐकून शिवाजी महाराजांना मनुष्य जीवनाचे ध्येय प्राप्त झाल्याचा आनंद झाला. आपल्याला भगवद् इच्छेप्रमाणे राज्य करायचे आहे हे त्यांनी जाणले. त्या संध्याकाळी सर्वांच्याबरोबर शिवाजीराजांनी कीर्तनप्रवचनाचा आनंद घेतला. सायंकाळी प्रवचनामध्ये तुकारामांनी मनुष्य जीवनाचे ध्येय भगवद्भक्ती हे आहे इतर गोष्टीमध्ये वेळ वाया न घालवता भगवद्भक्तीसाठी शरीराचा कसा उपयोग करावा हे पटवून सांगितले. त्या कीर्तनाने प्रभावित होऊन शिवाजीराजांच्या मनात भौतिक संसाराबद्दल वैराग्य निर्माण झाले. त्यांनी ठरविले की या क्षणापासून आपल्या राज्याचा त्याग करून एकांतात वनामध्ये हरिचिंतन करीत बसेन. असा विचार करून शिवाजीराजांनी आपला राजमुकूटही खाली धरणीवर काढून ठेवला. तुकारामांच्या संगतीमध्ये राजे भगवद्भक्तीचा आनंद अनुभवत होते. आपल्याबरोबर आलेल्या मंत्र्यांनाही राजांनी आदेश दिला की माझ्याबरोबर कोणी येऊ नये. यामुळे मंत्री गोंधळात पडले आणि त्यांनी त्वरित आई जिजाऊंना घडत असलेल्या घटनांबद्दल सविस्तरपणे वृत्तांत कळवला. जिजाऊंना ही बातमी कळल्यावर ताबडतोब त्या पालखीत बसून लोहगावला तुकारामांना भेटण्यास आल्या. जिजाऊंनी शिवाजीराजांच्या मनात वैराग्य उत्पन्न झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. जिजाऊंचे हृदयस्पर्शी चिंतेचे उद्गार ऐकून तुकाराम महाराज म्हणाले “तुम्ही कुठल्याही प्रकारची चिंता करू नका. विठोबाचे चिंतन करा. सर्व काही ठीक होईल. मी शिवाजीराजांना समजावून सांगेन.’’
हे तुकारामांचे आश्वासक शब्द ऐकून जिजाऊमातेला धीर आला. त्यानंतर तुकारामांनी शिवाजीराजांना उद्देशून क्षत्रिय धर्माबद्दल वर्णन करताना सांगितले ‘शत्रूला युद्धात पराभूत करून स्वधर्म पालन करण्यासाठी प्रजेचे रक्षण करावे. एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबाला सुखी पाहून आनंदित होते, त्याचप्रमाणे प्रजेच्या सुखामध्येच राजांनी आनंद मानावा. भगवद्प्राप्तीसाठी क्षत्रियांनी दान करावे व काया, वाचा, मनाने कुणालाही फसवू नये. प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे या भावनेने व्यवहार करावा, नित्य भगवंताचे नामस्मरण सर्वानी करावे.’ तुकारामांचा हा उपदेश शिवाजीराजांसहीत सर्वजण मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. शिवाजीराजांनी तुकारामांची आंतरिक इच्छा ओळखली, त्यांनी जाणले की भागवत धर्म रक्षणासाठी क्षत्रिय धर्माचे पालन आपण केले पाहिजे. त्यांनी धरणीवर ठेवलेला राजमुकुट ‘श्रींची इच्छा’ म्हणून आपल्या शिरावर धारण केला. राजांनी आपल्या क्षत्रिय धर्माची जबाबदारी ओळखून तुकाराम महाराज व आपली आई जिजाऊमातेच्या चरणी वंदन केले. त्यानंतर शिवाजी राजांनी पुन्हा तुकारामांच्या आदेशाप्रमाणे धर्माचे पालन करत ‘श्रींच्या इच्छे’प्रमाणे राज्य केले. आजचे राजकारणी, साधू संत आणि गोंधळून गेलेला समाज यावरून आपल्या जीवनात प्रेरणा घेतील हीच अपेक्षा.
वृंदावनदास








