अध्याय चौदावा
भगवंत म्हणाले, उद्धवा माझी अल्पशी भक्तीही पातकांच्या राशी पूर्णपणे जाळून खाक करते. भक्तीच्या एका अंशाची थोरवी एवढी आहे तर माझ्या संपूर्ण भक्तीचा महिमा किती असेल ? विशेष म्हणजे तो वेदशास्त्रांनासुद्धा अतक्मर्य आहे ! माझी भक्ती अलक्ष्य असल्यामुळे ती पाहता येत नाही. अतक्मर्य असल्यामुळे शास्त्रमीमांसेनेही तिच्याविषयी तर्क होत नाही. ती अगाध असल्यामुळे, कितीही साधने करून थकले तरीही ती खरोखर आकलन होत नाही. माझ्या भक्तीचा महिमा माझे भक्त जाणून असतात. म्हणून मी भक्तांचा आज्ञाधारक होतो. त्यांचा शब्द मुळीच उल्लंघत नाही.
भक्तांची थोरवी अगाध आहे, म्हणून मीसुद्धा त्यांची सेवा करतो. भक्तांच्या पायांचे धुलिकण मला शिरसावंद्य आहेत. भक्तीचे रहस्य अत्यंत गूढ आहे. ते श्रुतिशास्त्रांनासुद्धा स्पष्ट कळत नाही. मनुष्य ज्याची भक्ती करतो त्याच्याबद्दल त्याच्या मनात अकृत्रिम प्रेम उत्पन्न होते. हे कसे घडते ते समजून घेऊ म्हंटले तर समजत नाही. कृपण मनुष्य कितीही लांब गेला, तरी घरात ठेवलेली ठेव तो मनात धरून ठेवतो, त्याप्रमाणे भक्त सर्वदा माझ्यावरच मनापासून प्रेम करतो. त्याला माझ्या प्रेमाचे सोहळे करण्याची अत्यंत आवड उत्पन्न होते, आणि अन्तःकरणापासून कळवळा उत्पन्न होऊन अधिकाधिक उत्कर्षाने उल्हास वाढत जातो किंवा भाग्यवान् जावई घरी आला असता ज्याप्रमाणे सासू आपले सर्वस्व त्याच्याकरिता खर्ची घालते, त्याप्रमाणे माझा कळवळा पूर्णपणे ज्याच्या अंतःकरणांत भरून जातो किंवा बी अधिक अधिक पेरले जाईल तितका तितका शेतकऱयाच्या मनाला उल्हासच वाटत असतो,
त्याप्रमाणे मला सर्वस्व अर्पण करताना ज्याच्या मनाला तसाच उल्हास वाटतो किंवा गुणवान, सुस्वरूप आणि श्रीमान् पती घरातून निघून दूर गेला असता त्याची स्री त्याच्याकरिता जशी तळमळते, त्याप्रमाणेच माझ्याकरिता ज्याच्या अंतःकरणात कळवळा उत्पन्न होतो त्याचेच नाव माझी भक्ती हे निश्चित समज. ज्या भक्तीला भुलून मी लक्ष्मीकांत भक्तांच्या हातात सापडलो आहे. अधिकाधिक आवडीने माझी प्रीती उत्पन्न होते, तीच भक्ती होय असे समज. अशा प्रकारे भक्तीचा महिमा श्रीकृष्णांनी स्वतः उद्धवाला सांगितला. प्रेमाने उद्धवाला पोटाशी धरून देव त्याला म्हणाले, जिच्यापाशी मी सर्वदा राहतो, ती माझी भक्ती अशी असते हे लक्षात ठेव. संसार तरून जाण्याच्या उपायांमध्ये भक्ती हीच काय ती एक मुख्य होय. मोक्षसुद्धा हिच्या चरणी लागतो. मग बिचारी इतर साधने ती काय ? हे पहा! मी त्रैलोक्मयात अजिंक्मय आहे. त्या मला भक्तांच्या सामर्थ्याने जिंकून भक्तीच्या बळाने मला आपला ताबेदार बनविले. म्हणून सर्व विजयाहुन श्रे÷ अशी सर्वस्वी माझी भक्तीच होय. तीही हकीकत ऐक. तुला मी सविस्तर सांगतो. हे उद्धवा ! माझ्या अनन्य भक्तीने जसा मी प्राप्त होतो, तसा योग, ज्ञान, धर्माचरण, स्वाध्याय, तप किंवा त्याग यांनी प्राप्त होत नाही. नित्य कोणते व अनित्य कोणते हे ज्ञान देणारे जे सांख्यशास्त्र, अथवा जे नित्य-नैमित्तिक कर्म किंवा सर्व अष्टांगादि योग, हे देखील माझी प्राप्ती करून द्यावयास समर्थ नाहीत.
किंवा ज्याला ‘स्वाध्याय’ असे म्हणतात ते वेदाध्ययन किंवा वायु, उदक व पिकलेली पाने भक्षण करून होणारे जे तप किंवा संन्यासग्रहण इत्यादि जो त्याग, ही सर्व माझ्या भक्तीशिवाय दुर्बळ होत.
ज्याप्रमाणे नाकाशिवाय सौंदर्य, किंवा मस्तकाशिवाय सर्व अवयव, किंवा पतीशिवाय सौभाग्यवती स्त्री, ही सर्व विटंबना होय, त्याप्रमाणे माझ्या भक्तीशिवाय सर्व साधने दुर्बळ होत. त्या सर्वात माझ्यापर्यंत पोचण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल असे बळ नाही. माझी भक्ती मात्र माझे प्रेम अधिकाधिक वाढवून तत्काळ माझी प्राप्ती करून देते.
जेव्हा माझी भक्ती उत्पन्न होते, तेव्हाच माझी प्राप्ती होते. हे श्रीकृष्ण उद्धवाला पुनःपुन्हा आनंदाने सांगू लागले.
उद्धवा, रत्नाबरोबर जसे त्याचे तेज असते, अरुणाबरोबर जसा सूर्य असतो, त्याप्रमाणे खरोखर भक्तीपाशी मी लक्ष्मीपती राहिलेला असतो.
क्रमशः







