प्रतिनिधी/ चिपळूण
जिल्हय़ात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आढळत असलेल्या चिपळूण तालुक्यात स्थानिक प्रशासनाने शिमगोत्सवावर कडक निर्बध आणून शासन आदेशाची काटेकोर अंमलबजावणी केली आहे. मात्र दुसरीकडे कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या राजकीय कार्यक्रमांना मोकळीक दिल्याने सद्यस्थितीत रॅली, मेळावे आणि भूमीपूजनाचे कार्यक्रम मोठय़ा गर्दीत केले जात आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांना कोरोना महामारीत प्रशासनाने सुट दिली आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गेल्या आठवडय़ात शहरात कांग्रेसच्या माध्यमातून दोन दिवस तीन कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये पहिल्या दिवशी महागाईच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ शहरातून निषेध रॅली काढण्यात आली. यात मोठय़ा संख्येने कॉंग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते. दुसरीकडे उपोषण आणि युवकांचा मेळावा बंदिस्त सभागृहात घेण्यात आला. या तीनही कार्यक्रमांची छायाचित्रे सर्वत्र प्रसिध्द झाली. यामध्ये झालेली गर्दीही सर्वानी अनुभवली. विशेष म्हणजे माजी खासदार हुसेन दलवाई हे कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर दोन दिवसांत त्यांच्या संपर्कातील पदाधिकारीच रॅली आणि अन्य कार्यक्रमात सर्वत्र आघाडीवर होते. दोन दिवसांपूर्वी पोफळी येथे राष्ट्रवादीच्या माध्यमातून विविध विकासकामांची भूमीपूजने, लोकार्पण कार्यक्रम घेण्यात आले.
मुळातच कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेत संपूर्ण जिल्हय़ात रूग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यातही चिपळूण तालुक्यात मोठय़ा संख्येने रूग्ण सापडत आहेत. कोरोनात गर्दी टाळण्यासाठी शासनाने कोकणातील महत्वपूर्ण शिमगोत्सवावर निर्बध आणले आहेत. अगदी पालखीही घरोघरी नेण्यास बंदी घातली आहे. सार्वजनिक तसेच धार्मिक कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी असतानाच चिपळुणात स्थानिक प्रशासन राजकीय कार्यक्रमांना कशी परवानगी देत आहे, असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे. सद्यस्थितीत शिमगोत्सव सुरू असलेल्या गावांत पोलीस कर्मचारी फेरफटका मारून ग्रामस्थांना नियम समजावून सांगत आहेत, तर दुसरीकडे कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱया राजकीय नेते, पदाधिकाऱयांना मात्र अभय मिळत असल्याने स्थनिक प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेबाबत चिड व्यक्त होत आहे.









