केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा टोला : एकटा समाज राजकारण करू शकत नाही : राजकारणापासून समाजाला अलिप्त ठेवा
प्रतिनिधी /म्हापसा
सत्ता मिळाल्यास भंडारी मुख्यमंत्री हे प्रत्येकाचे वैयक्तिक मत आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी जे काही म्हटले तो ‘आप’ पक्षाचा निर्णय आहे. हा विषयही तेवढा मोठा आहे. निवडणुका जवळ आल्या की या सर्व गोष्टी सुरू होतात. घोषणा करण्यात काय आहे. त्यांचा एकही आमदार, मंत्री राज्यात नाही. प्रथम ‘आप’ने आमदार निवडून आणू द्या, नंतर भंडारी मुख्यमंत्र्याबाबत बोलू. असा टोला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हापसा येथे पत्रकारांशी बोलताना हाणला.
म्हापसा येथे आयोजित एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. उत्तर गोवा भाजपा अध्यक्ष महानंद अस्नोडकर यांचीही यावेळी उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री सिसोदिया यांचे जे मत आहे ते आपण चुकीचे म्हणत नाही. मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. समाज हा घटक राजकारणापासून अलिप्त असायला पाहिजे. एक समाज राजकारण करू शकत नाही. आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायला पाहिजे आणि भाजप पक्ष याबाबत योग्य निर्णय घेणार आहे.
पक्ष सोडावा की राहावे हा मायकल लोबोंचा वैयक्तिक प्रश्न : अस्नोडकर
भाजपा उत्तर गोवा अध्यक्ष महानंद अस्नोडकर म्हणाले की, सध्या उमेदवारांचा जो प्रश्न वृत्तपत्रातून चर्चेला येत आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्रीय समिती आहे. ती समिती निर्णय घेऊन केंद्राला पाठविणार. येथे कुणीही लुडबूड केली तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मंत्री मायकल लोबो बोलतात, तसे सत्य असेल तर त्यांच्यावर पक्षाने कारवाई करायला पाहिजे. 2015 मध्ये जिल्हा पंचायतीविरोधात लोकसभेत त्यांच्या मतदारसंघात कमी मते मिळाली याचा अर्थ लोबो प्रत्येकवेळी भाजप विरोधात काम करतात. मग त्यांच्यावर पक्ष कारवाई करण्यास दिरंगाई का करतो? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना केला असता, पक्ष सर्वांना सांभाळण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी पक्ष सोडावा की रहावे हा त्यांचा निर्णय आहे, असे अस्नोडकर म्हणाले.
अशोक नाईक यांच्याबाबत विचारले असता हेच आपण सांगितले आहे. समाजकारण करताना राजकारण आणू नये. कारण समाज हा राजकारण करू शकत नाही, असे श्रीपाद नाईक म्हणाले.









