सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रोज होतात सहा शस्त्रक्रिया : 95 रुग्णांवर सुरू आहेत उपचार
प्रतिनिधी /बेळगाव
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 26 दिवसात ब्लॅक फंगसची लागण झालेल्या 100 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या इस्पितळात पूर्वी केवळ दोन ते तीन शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. आता रोज सरासरी सहा शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. उमेश कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.
बिम्स प्रशासनाने सोमवारी या संबंधी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 26 मे रोजी ब्लॅक फंगसचा पहिला रुग्ण आढळला होता. त्याच्यावर दोन दिवसांत दि. 28 मे रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. सुरुवातीला डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांची कमतरता होती म्हणून रोज केवळ दोन ते तीन शस्त्रक्रिया सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होत होत्या.
प्रादेशिक आयुक्त अमलान आदित्य बिस्वास यांच्यावर बिम्सची प्रशासकीय व्यवस्थेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपविल्यानंतर हुबळी-धारवाड व गदग येथून शस्त्रक्रियेसाठी आवश्यक डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. ईएनटी विभागाचे तज्ञ, पीजी विद्यार्थी, भूल विभाग तज्ञांचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे रोज सरासरी सहा शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.
गेल्या 26 दिवसात ब्लॅक फंगसने त्रस्त असलेल्या 100 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या 95 रुग्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे. 35 बाधितांच्या डोळय़ाजवळ इंजेक्शन देण्यात आले आहे. त्यांच्या डोळय़ांनाही हळूहळू दिसू लागले आहे, अशी माहिती बिम्स प्रशासनाने दिली.
ईएनटी, नेत्रतज्ञ, वैद्यकीय विभाग, भूलतज्ञ, एक्सरे विभाग, परिचारिका, फार्मसी व ग्रुप डी कर्मचाऱयांच्या सहकार्यातून ब्लॅक फंगस बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत, अशी माहिती बिम्सच्या वैद्यकीय संचालकांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
660 जणांना लस
बिम्समध्ये सोमवारी रात्रीपर्यंत 216 कोरोना बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. सोमवारी दिवसभरात 660 जणांना लस देण्यात आली आहे.









