आरोग्य यंत्रणा हादरली : एक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल
- नाथ पै सेंटरकडून कोरोनापश्चात फॉलोअपमुळे रुग्ण समजला
- पुढील चाचण्यांअंती आजारावर होणार शिक्कामोर्तब
- जिल्हय़ात कोरोनापश्चात फॉलोअप घ्यावा लागणार
प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
रेडझोनमध्ये गेलेल्या सिंधुदुर्गची चिंता दिवसेंदिवस वाढत असतानाच शनिवारी आणखी एका धक्कादायक वृत्ताने जिल्हा आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली. जिल्हय़ात पहिल्यांदाच ‘ब्लॅकफंगस’सदृश (म्युकरमायकोसीस) दोन रुग्ण सापडून आल्याचे सायंकाळी समजले. यातील एका रुग्णाला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून अन्य रुग्ण उपचार होऊनही सुधारणा होत नसल्याने अत्यवस्थ स्थितीत मुंबईहून घरी परतला आहे.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णाच्या पुढील चाचण्या घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्याने त्याच्यावर जिल्हा रुग्णालयातच उपचार करायचे की अधिक उपचाराकरिता जिल्हय़ाबाहेर हलवायचे, याचा निर्णय उद्या, रविवारी घेतला जाणार आहे.
सिंधुदुर्गात प्रथमच सापडून आलेल्या या ब्लॅकफंगससदृश रुग्णांमध्ये एक 52 वर्षांचा पुरुष असून दुसरा रुग्ण ही 72 वर्षीय महिला आहे. हे दोन्ही रुग्ण कुडाळ एमआयडीसी येथील नाथ पै कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होते. पैकी पुरुष असलेला रुग्ण उपचाराअंती पूर्णत: कोविड मुक्त होऊन घरी परतला होता, तर 72 वर्षीय महिला उपचार घेत असतानाच ऑक्सिजन कमी होऊ लागल्याने तिला जिल्हा कोविड रुग्णालयात हलविण्यात आले होते.
नाथ पै कोविड सेंटरने आपल्या सेंटरमधून बरे होऊन जाणाऱया रुग्णांच्या तब्येतीला पूर्णपणे आराम पडेपर्यंत ‘फॉलोप’ सुरू ठेवला आहे. अशा एका फॉलोपमध्ये पुरुष रुग्णाच्या डोळय़ाला शुक्रवारपासून सूज आल्याचे आढळून आले. एकंदर घेण्यात आलेल्या या फॉलोपमध्ये डोळय़ाला आलेली सूज ही ब्लॅकफंगसच्या लक्षणांसारखी वाटू लागल्याने नाथ पै कोविड सेंटरकडून त्यांना तातडीने डोळय़ांचे सिटीस्कॅन करून घेण्याबाबत सूचना करण्यात आली. सिटीस्कॅन केल्यानंतर ब्लॅकफंगससदृश प्राथमिक लक्षणे आढळल्याचे समजले. ही प्राथमिक लक्षणे दिसताच त्या रुग्णाला त्वरित जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले व त्याच्या पुढील चाचण्यांना सुरुवात करण्यात आली.
दुसरा रुग्ण असलेली महिला कोरोनाने अधिकच गंभीर झाल्याने तिला जिल्हा रुग्णालयातून मुंबई येथे हलविण्यात आले होते. मुंबई येथील तपासणीत त्या वृद्धेलाही ब्लॅकफंगससदृश लक्षणे असल्याचे निदर्शनास आले. परंतु तिच्यावर पुढील उपचार करेपर्यंत हा आजार मेंदूपर्यंत पोहोचल्याने अखेर डॉक्टरांच्या परवानगीने नातेवाईकांनी तिला घरी आणले. मात्र या रुग्णाबाबत जिल्हा आरोग्य यंत्रणा काय निर्णय घेते, याबाबत अद्याप काही समजलेले नाही.
सापडलेल्या या रुग्णांमधील लक्षणे ब्लॅकफंगसशी तंतोतंत जुळणारी असली, तरी जोपर्यंत सरकारी आरोग्य यंत्रणा अधिकृतपणे त्याची घोषणा करीत नाही, तोपर्यंत या रुग्णांना ब्लॅकफंगससदृशच म्हणावे लागेल.
शासकीय कोविड सेंटरमधून कोरोनावर मात करून घरी परतणाऱया रुग्णांची पुढे कुठलीही नोंद ठेवली जात नाही. त्यामुळे आता मागील पंधरवडय़ात कोरोनावरील उपचार घेऊन घरी परतलेल्या रुग्णांच्या तपासणीची मोठी मोहीम जिल्हा आरोग्य यंत्रणेला युद्धपातळीवर हाती घ्यावी लागणार आहे. एवढंच नव्हे, तर आता फक्त कोविडच्याही पुढे जात संभाव्य धोका ओळखून ब्लॅकफंगसला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणेला युद्धपातळीवर जय्यत तयारी करावी लागणार आहे. तसेच या आजारासाठी लागणारी औषधे व इंजेक्शन्स तैनात ठेवावी लागणार आहेत.









