ब्रिटनने युरोपियन युनियन सोडण्यासाठी 2016 साली सार्वमत घेतले आणि त्यानुसार युरोपियन युनियन सोडण्यावर शिक्कामोर्तब झाले. तथापि, युरोपियन युनियन सोडण्यासाठीची प्रक्रिया आणि सोडल्यानंतर युनियन आणि ब्रिटनचे संबंध यासाठीच्या नियम, अटी, करार हा जटिल व्यवहार एकमताने संपविण्यासाठी 31 जानेवारी 2020 हा दिवस उजाडावा लागला. तोपर्यंत ‘ब्रेक्झिट’ घडणार की नाही, याबाबत तर्कवितर्क आणि चर्चा जगभरात सुरूच राहिल्या. ही प्रक्रिया इतकी लांबण्याचे कारण म्हणजे ब्रिटन आणि युरोपियन युनियनमधील नवा व्यापारी करार, लोकांचा उभय प्रदेशातील प्रवास, त्यांच्या रहिवासाची आणि नोकरी वा कामाची करारानंतरची स्थिती व व्यवस्था यावर प्रदीर्घ चर्चा, मतमतांतरे होत राहिली.
अखेर युरोपियन युनियन विधेयक (भविष्यकालीन संबंध) या नावे हाऊस ऑफ कॉमन्स सभागृहात ब्रिटनने बहुमताने कायदा मंजूर केला. त्यावर प्रथेनुसार ब्रिटनच्या राणीने शिक्कामोर्तब केले आणि अधिकृतरित्या ब्रेक्झिट घडून आले. यानंतर लागलीच बीबीसी या वृत्तवाहिनीस मुलाखत देताना ब्रिटनचे पंतप्रधान म्हणाले, ‘ब्रेक्झिटनुसार आता आम्ही आमच्या मार्गाने जाण्यास मोकळे तर आहोतच शिवाय युरोपियन युनियनशी मुक्त व्यापार करण्यासही पात्र आहोत’. अशा रीतीने ब्रेक्झिट पूर्ण झाले असले तरी संपूर्ण युरोपमध्ये ब्रिटनने युरोपियन युनियनशी घेतलेली फारकत फारशा आनंदाने स्वीकारली गेली नाही. तसे पाहता संपूर्ण युरोप खंडास एकात्म करणारे घटक सुरुवातीपासूनच कमी आहेत. अनेक छोटय़ा-मोठय़ा देशांनी बनलेला हा खंड लोक, संस्कृती, राजकारण, दृष्टिकोन अशा कोणत्याही बाबतीत एकसंध नाही. तथापि, युरोपियन युनियनपासून ब्रिटनची ताटातूट हा विषय युरोपातील साऱयांनाच समदु:खी बनवणारा ठरला आहे. ब्रिटनच्या बाहेर पडण्यामुळे युरोपियन युनियनचे भले झाले असे लोकांनाच नाही तर विविध देशांच्या राजकारण्यांना व मुत्सद्यांनाही वाटत नाही, इतकी ही घटना नववर्षाच्या आरंभीच वेदनादायी ठरली आहे. ब्रेक्झिटबाबत ब्रिटनमध्ये माजलेला राजकीय गोंधळ, मतभेद पाहता युरोपमधील बरेच लोक या विषयावर विनोद करण्यात मश्गुल होते. ब्रेक्झिट प्रत्यक्षात न येता ब्रिटन युरोपियन युनियनच्या कुटुंबात पुन्हा येईल असे सार्वत्रिक मत बनत चालले होते. तथापि, वास्तव हे तर्कापेक्षा वेगळे असते, हे ब्रेक्झिटमधून प्रत्ययास आले आणि युरोपभर एक खिन्न करणारी स्तब्धता पसरली आहे.
ब्रिटनचे यापूर्वीचे युरोपियन युनियनमधील स्थान या विषयाकडे पाहता असे दिसते, की ब्रिटन या बेटाच्या देशाचा युनियनमधील अंतर्भाव हा सहजसोपा नव्हता. युनियनशी बांधील झालेला ब्रिटन हा काहीसा गैरसोयीचा, अडखळणारा सदस्य होता. युरोप महासंघात त्याला एकात्म करण्यासाठी युरोपियन युनियनला सवलती, सूट, राजकीय करार अशा नाना मार्गांचा अवलंब सातत्याने करावा लागत होता. युरोपियन युनियनसाठी ब्रिटन हा एक चलन पद्धती, प्रत्येक नियम यास बांधील नसलेला विशेष देश होता.
विविध विषयांवर ब्रिटनचे युनियनशी सातत्याने मतभेदही होते. तरीही कुटुंबातील एक किरकिरा सदस्य म्हणून अशा कुरबुरींवर मलमपट्टी होत राहिली. परंतु, अखेर जे व्हायचे तेच झाले. ब्रिटनने बेक्झिटचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम म्हणून सुरुवातीच्या काळात युरोपमध्ये त्यापासून प्रेरणा घेऊन म्हणा किंवा योगायोग म्हणा युरोपमध्ये प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध दंड थोपटणाऱया पक्षांना नवे धुमारे फुटू लागले. युरोपियन युनियनविरुद्ध भावना उभारी घेऊ लागल्या. युरोपियन युनियन आता फुटणार अशी भाकिते वर्तविली जाऊ लागली. मात्र, ब्रेक्झिट प्रत्यक्षात येण्यासाठी ब्रिटनला ज्या कसरती कराव्या लागल्या, जे मतभेद निर्माण झाले, जी सत्तांतरे तेथे झाली याचा परिणाम म्हणून युरोपियन युनियनच्या विरोधात असलेला सूर हळूहळू क्षीण होऊन अखेर विरून गेला. यानंतर युनियनमधून बाहेर पडलेल्या ब्रिटनची भरभराट होत गेली. मुक्त देशाचे दर्शन ब्रिटनच्या नव्या अवतारातून दिसू लागले तरच कदाचित युरोपियन युनियनच्या एकसंधतेला आव्हान मिळण्याच्या शक्मयता निर्माण होतील.
या साऱया पार्श्वभूमीवर बेक्झिटचा प्राण ज्यात आहे तो ब्रिटन-युरोपियन युनियन नवा व्यापारी करार नेमक्मया कोणत्या मुद्दय़ांना अधोरेखित करतो हे देखील पाहण्यासारखे आहे. हा संपूर्ण गुंतागुंतीचा करार तब्बल बाराशे पानांचा आहे. व्यापाराच्या बाबतीत या करारानुसार 1 जानेवारी 2021 पासून ब्रिटन व युरोपियन युनियनमध्ये जो व्यापार होईल त्यावर कोणताही कर वा जकात आकारली जाणार नाही. व्यापाराच्या रकमेवर व प्रमाणावरही बंधने नसतील. सीमारेषेवर मात्र सुरक्षा तपासणी, कस्टम प्रमाणपत्रे यांची तरतूद राहील. जे उद्योग सेवा क्षेत्रातील आहेत,
उदाहरणार्थ बँकिंग, स्थापत्यशास्त्र, आर्थिक हिशोब ठेवण्याबाबतची सेवा त्यांच्यासाठी ब्रिटनला पूर्वीप्रमाणे युरोपियन बाजारपेठेत आपोआप प्रवेश मिळणार नाही. त्यावर काही बंधने आली आहेत. ब्रिटनसाठी व्यावसायिक गुणवत्तेसंदर्भातील सहजसुलभ ओळखपत्र आता अस्तित्वात राहणार नाही. यानुसार ब्रिटनमधील डॉक्टर्स, स्वयंपाकी, स्थापत्यशास्त्रज्ञ व इतर सेवा देणाऱया व्यावसायिकांना युरोपियन युनियनमधील ज्या देशात ते व्यवसाय करू पाहतात तेथील इतर देशासंबंधीच्या नियमावलीतून व गुणवत्ता परीक्षणातून जावे लागणार आहे. यामुळे सेवा क्षेत्रातील व्यावसायिकांना युरोपियन देशात कुठेही काम करणे पूर्वीइतके सोपे राहणार नाही. प्रवाशांसाठी 90 दिवसांवर युरोपियन युनियनमधील कुठल्याही देशात ब्रिटिश नागरिकास रहायचे असल्यास तितक्मया दिवसांचा व्हिसा असणे आवश्यक आहे.
मासेमारीच्या बाबतीत पुढील साडेपाच वर्षात ब्रिटनला स्वत:च्या अखत्यारीतील समुद्रातले मासे टप्प्याटप्प्याने अधिकाधिक प्रमाणात मिळविण्याचा अधिकार मिळत जाईल. इ. स. 2026 पासून ब्रिटन युरोपियन युनियनच्या बोटींना आपल्या समुद्रातील मच्छीमारीपासून मज्जाव करू शकतो. मात्र, त्या बदल्यात ब्रिटनमधून येणाऱया मत्स्य विक्रीवर युरोपियन युनियनकडून करवसुली करण्यात येईल. युरोपियन न्यायालयास यापुढे ब्रिटनमध्ये कोणतीच भूमिका असणार नाही. जे वाद ब्रिटन आणि युनियनमध्ये असतील ते येथून पुढे स्वतंत्र लवादाकडे सोपविले जातील. यामुळे ब्रिटनला आपल्या कायदा व्यवस्थेवर स्वत:चे असे स्वतंत्र नियंत्रण प्रस्थापित करता येईल. यापुढे ब्रिटनला महत्त्वपूर्ण सुरक्षाविषयक माहितीसाठी युरोपियन युनियनच्या माहिती साठय़ाचा आपोआप लाभ मिळणार नाही. यासाठी विनंतीअर्ज द्यावा लागेल. याचबरोबरीने शिक्षण, कृषी, आरोग्य यासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्राविषयी ब्रिटन आणि युनियनच्या दरम्यान नवी नियमावलीही जारी होणार आहे. एकूणच ब्रेक्झिटच्या संपूर्ण प्रक्रियेनंतर ब्रिटन व युरोपियन युनियनसाठी भविष्यकाळात कोणता अध्याय सुरू होणार आहे, यासाठी आता प्रतीक्षा करावी लागेल.
अनिल आजगावकर, मोबा.9480275418








