त्रिपुरात पोलिसांकडून अश्रूधूराचा वापर : मुद्दा चिघळण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ अगरतळा
त्रिपुरात ब्रू शरणार्थींना कायमस्वरुपी वसविण्याच्या योजनेला विरोध सुरू झाला आहे. त्रिपुरा जिल्हय़ाच्या डोलुबरी गावात मिझोरमधून आलेल्या ब्रू शरणार्थींच्या पुनर्वसनाच्या योजनेच्या विरोधात लोक रस्त्यांवर उतरले असून निदर्शने करत आहेत.
निदर्शने पाहता तेथे मोठय़ा संख्येत पोलीस तैनात करण्यात आले आहेत. स्थानिक लोक मोठय़ा संख्येत घरांमधून बाहेर पडून विरोध दर्शवत आहेत. निदर्शनांनी हिंसक वळण घेतल्याने पोलिसांनी अश्रूधूराचा वापर करत नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. निदर्शकांनी डोलुबरी गावात वाहने पेटवून दिल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर गावात निदर्शकांनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखून धरली आहे.
मिझोरममधून पलायन केलेले ब्रू समुदायाचे 30 हजारांहून अधिक शरणार्थी त्रिपुरातील शिबिरांमध्ये राहत आहेत. 1997 मध्ये मिझोरममध्ये झालेल्या हिंसाचारानंतर ब्रू समुदायाचे लोक येथील शिबिरांमध्ये राहू लागले होते. दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून ते तेथे राहत आहेत.
चालू वर्षाच्या प्रारंभी केंद्र सरकारने ब्रू समुदायासाठी 600 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. त्रिपुरा, मिझोरम आणि ब्रू समुदायाच्या प्रतिनिधींदरम्यान करार करण्यात आला होता. या करारानंतर शरणार्थींना त्रिपुरातच वसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
ब्रू समुदायाच्या लोकांना घरासाठी जमीन देण्यासह 5 हजारांपेक्षा अधिक कुटुंबातील एका सदस्याच्या खात्यात 4 लाख रुपयांची मुदतठेव ठेवण्यात येणार आहे. तसेच प्रतिव्यक्ती हिशेबाने दोन वर्षांपर्यंत मोफत धान्यही उपलब्ध करण्यात येणार आहे. याचबरोबर त्रिपुरा सरकारकडून देण्यात आलेल्या जमिनीचा मालकी हक्क मिळाल्यावर लोकांना दीड लाख रुपये घरनिर्मितीसाठी देण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली होती.









