क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे स्पष्टीकरण, पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणेच कसोटी होणार
सिडनी / वृत्तसंस्था
क्वीन्सलँड राज्यातील कडक क्वारन्टाईन नियमांमुळे भारतीय संघ तेथे चौथी कसोटी खेळण्यास राजी नाही, या कथित वृत्ताचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोमवारी स्पष्टपणे इन्कार केला. क्वीन्सलँडचे जे शिष्टाचार, नियम आहेत, त्याचे पूर्ण पालन करण्याची तयारी बीसीसीआयने दर्शवली आहे, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी निक हॉकली म्हणाले.
आम्ही सर्व घडामोडींबाबत बीसीसीआयच्या समकक्ष अधिकाऱयांशी सातत्याने संपर्कात आहोत, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला. बीसीसीआयने सहकार्याची भूमिका घेतली आहे आणि त्यांनी कसोटी अन्यत्र हलवण्याची कोणतीही विनंती केलेली नाही. दोन्ही संघ पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे खेळण्यास राजी आहेत, असेही ते म्हणाले.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (एससीजी) गुरुवारपासून खेळवली जाणार आहे. त्यानंतर चौथी व शेवटची कसोटी गब्बावर दि. 15 ते 19 जानेवारीपर्यंत होईल. उभय संघातील ही 4 कसोटी सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे.
भारतीय संघ चौथ्या कसोटीसाठी ब्रिस्बेनला जाण्यास इच्छुक नसून यामुळे चौथी कसोटी होणे अनिश्चित आहे, असा दावा ऑस्ट्रेलियातील काही प्रसारमाध्यमांनी केला होता. भारतीय संघाला चौथी कसोटी देखील सिडनीतच खेळायची आहे, असाही त्यात दावा नमूद होता. पण, आता प्रत्यक्ष क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच त्यात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
तूर्तास, क्वीन्सलँडने न्यू साऊथ वेल्समधून आता येणाऱया सर्व प्रवांशाना प्रवेशबंदी लागू केली असून सिडनी ही न्यू साऊथ वेल्सची राजधानी आहे. भारत व ऑस्ट्रेलियाचे पथक सोमवारी सर्व खेळाडू व साहायक पथकातील सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर सिडनीला रवाना झाले. भारतीय उपकर्णधार रोहित शर्मा, सलामीवीर शुभमन गिल, यष्टीरक्षक ऋषभ पंत, मध्यमगती गोलंदाज नवदीप सैनी व फलंदाज पृथ्वी शॉ हे प्रोटोकॉल तोडल्याच्या आरोपावरुन आयसोलेट केले गेल्यानंतर दोन दिवसांनी हॉकली यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाची भूमिका स्पष्ट केली.
‘ट्वीटरवर नवलदीप सिंगने भारतीय खेळाडूंची काही छायाचित्रे व व्हीडिओ पोस्ट केली. त्याबद्दल आम्ही बीसीसीआयसह संयुक्त चौकशी करत आहोत’, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पाठवलेल्या ईमेलमध्ये नमूद केले. ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लियॉनने मात्र जे आपल्या नियंत्रणात नाही, त्यावर विचार करण्याऐवजी दोन्ही संघांनी पुढील सामन्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे.
‘जे वृत्त दिले गेले आहे, त्याची आपण कोणीच इतकी चिंता करण्याची आवश्यकता नाही. ज्या बाबी आपल्या नियंत्रणात आहेत, त्यावर आपण विचार करायला हवा. सध्या फक्त गब्बा कसोटीबाबतच चर्चा सुरु आहे. माझ्या मते खेळाडूंनी सिडनी कसोटीसाठी पूर्ण सज्ज राहण्यावर भर देणे आवश्यक आहे’, असे लियॉन येथे म्हणाला.
रोहितसाठी आमची स्वतंत्र रणनीती : लियॉन
मेलबर्न : ‘भारतीय सलामीवीर रोहित शर्मा जागतिक दर्जाचा सलामीवीर आहे आणि तिसऱया कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर, आम्ही त्याचा लवकर बीमोड करण्यासाठी स्वतंत्र रणनीती राबवणार आहोत’, असे ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ऑफस्पिनर नॅथन लियॉन सोमवारी म्हणाला. रोहित यापूर्वी ऍडलेड व मेलबर्नमधील पहिल्या दोन कसोटी सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. पण, आता उर्वरित दोन कसोटीत तो खेळणार आहे.
‘जागतिक स्तरावर सर्वोत्तम सलामीवीरांमध्ये रोहित शर्माचा प्राधान्याने समावेश होतो. त्याला सामोरे जाणे आम्हा सर्व गोलंदाजांसाठी अर्थातच आव्हानात्मक असेल. पण, आम्ही स्वतःला आव्हान देऊ इच्छितो. आम्ही त्याच्यासाठी स्वतंत्र रणनीती आखली आहे’, असे लियॉन म्हणाला.
पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकल्यानंतर रोहित शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी देखील सांभाळणार आहे. लियॉनने यावेळी हंगामी भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेच्या संयमाचे येथे आवर्जून कौतुक केले. ‘रहाणेची एक मजबुतीची बाब अशी आहे की, तो प्रतिस्पर्ध्यांशी स्लेजिंग करण्यात अडकत नाही, किंवा क्रीझवर असताना प्रतिस्पर्धी गोलंदाजांशी संवादही साधत नाही. तो जागतिक दर्जाचा फलंदाज आहे आणि फलंदाजीवर त्याचे पूर्ण लक्ष केंद्रित असते. आघाडीचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीला सामोरे जाणे आमच्या फलंदाजांना जड जात असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे’, असे लियॉन येथे म्हणाला. यापैकी रहाणेने मेलबर्नमध्ये 112 धावांची दमदार खेळी साकारली तर अश्विन ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर, विशेषतः स्टीव्ह स्मिथवर सातत्याने वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये 100 सामन्यांच्या उंबरठय़ावर असणाऱया लियॉनने रहाणेला बाद करण्यासाठीही आपण रणनीती अंमलात आणणार आहोत, असे नमूद केले. आतापर्यंतच्या कारकिर्दीत 94 सामने खेळणाऱया लियॉनने 394 बळी घेतले आहेत. उभय संघातील तिसऱया कसोटी सामन्याचे थेट प्रसारण सोनी सिक्स, सोनी टेन 1, सोनी टेन 3 या वाहिन्यांवरुन केले जाणार आहे.
भारतीय पथकातील सर्व सदस्यांचे कोव्हिड-19 अहवाल निगेटिव्ह
मेलबर्न : सिडनीत होणाऱया तिसऱया कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडू व सहायक पथकातील सदस्यांची कोरोना चाचणी केली गेली असून त्यात सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, असे बीसीसीआयने जाहीर केले. उभय संघातील तिसरी कसोटी 7 जानेवारीपासून खेळवली जाणार असून भारतीय संघ पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे सोमवारी सिडनीत दाखल झाला.
‘आमच्या पथकातील सर्व सदस्यांची आरटी-पीसीआर चाचणी झाली. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत’, असे बीसीसीआयने ईमेलद्वारे जाहीर केले. रोहित शर्मा, शुभमन गिल, ऋषभ पंत, नवदीप सैनी, पृथ्वी शॉ हे एका इनडोअर रेस्टॉरंटमध्ये चाहत्यांसमवेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एकच राळ उठवली गेली होती. त्या पार्श्वभूमीवर, सर्व सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने संघासाठीही हा दिलासा ठरला आहे.









