ऑनलाईन टीम / लंडन :
ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेकाची लस दिल्यानंतर लहान मुलांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होत असल्याचा तक्रारी आल्यानंतर ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेकाने 6 ते 17 वर्षांपर्यंतच्या मुलांवरील लसीची चाचणी थांबवली आहे.
ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेकाने म्हटले आहे की, 6 ते 17 वर्षांपर्यंतच्या 300 मुलांवर या लसीची चाचणी करण्यात येणार होती. त्यासाठी लस दिलेल्या काही मुलांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होत असल्याचे समोर आले. त्यानंतर या लसीची लहान मुलांवरील चाचणी थांबविण्यात आली. ही लस निर्माती कंपनी आता ब्रिटनच्या औषध नियामकांकडून दिशानिर्देशनाची वाट पाहत आहे.
दरम्यान, ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेकाची लस घेतल्यानंतर वयस्कर व्यक्तींच्या शरीरात रक्ताच्या गाठी होत असल्याचा प्रकार यापूर्वी समोर आला होता. मात्र, या लसीमुळे रक्तात गुठळ्या होण्याचा कोणताही धोका नाही. ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे युरोपियन युनियनच्या औषध नियामक मंडळाने स्पष्ट केल्यानंतर पुन्हा जर्मनी, फ्रान्स, इटली आणि स्पेनने लसीच्या पुनर्वापराला मंजुरी दिली होती.









