लंडन
कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूशी जग लढत असताना ब्रिटनने मात्र एक वेगळाच निर्णय घेतलाय. येत्या 27 जानेवारीपासून हा देश मास्क फ्री होणार असून वर्क फ्रॉम होमची प्रणालीही मागे घेण्यात येणार असल्याचे समजते. ब्रिटनमध्ये आता कोरोना हा सामान्य जीवनातला घटक मानला जाणार आहे. एकीकडे तिसऱया लाटेने सर्वत्र धुमाकूळ घातला जात असताना ब्रिटनचा हा निर्णय कितपत योग्य ठरणार आहे, हे आताच सांगणे कठीण असणार आहे. नवनव्या व्हेरियंटचे आगमन हे होतच राहणार आहे, यासोबत आता जगावे लागणार आहे, असे या देशाने म्हटले आहे. कोरोना प्रसाराच्या बाबतीत हा देश चौथ्या नंबरवर आहे. गुरुवारी 1 लाखहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत आणि 330 जणांचा यात मृत्यु झाला आहे. असे असतानाही ब्रिटनने 27 जानेवारीपासून मास्क घालण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. देशात 72 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत तर 55 टक्के जणांना बूस्टर डोस दिला आहे. या प्रमाणामुळे लोकांमध्ये प्रतिकारक्षमता बळावली असल्याचा दावा सरकारने केला आहे.









