थंडीमुळे शरीरावर येतात पुरळ : शीतपेयाचा ग्लास पकडण्यासही वाटते भीती
जगात अनेक लोकांना विचित्र आजार आहेत. काही जणांना ऍलर्जी देखील असते, जी इतकी दुर्लभ असते की जेव्हा इतरांना त्याबद्दल कळते तेव्हा ते चकित होतात. कुणाला धुळीपासून ऍलर्जी असते तर काही जणांना खाण्यापिण्याच्या गोष्टींपासून ऍलर्जी असते. परंतु इंग्लंडमधील एका महिलेला थंडीपासून ऍलर्जी आहे. ही ऍलर्जी इतकी भयानक आहे की महिलेला यामुळे आपला मृत्यू होऊ शकतो अशी भीती सतावते.
केंटच्या ब्रॉडस्टेयर्स येथे राहणाऱया विकी नोबल यांनी स्वतःच्या अजब ऍलर्जीबद्दल सांगितले आहे. मला थंडीची ऍलर्जी आहे. शरीराला थंडीची जाणीव होताच अनेक पुरळ उठू लागतात, जे अत्यंत वेदना देणारे असतात. याचमुळे थंडीच्या दिवसांमध्ये मी विशेष काळजी घेत असल्याचे विकी यांनी म्हटले आहे.

थंडीपासून बचाव
थंडीच्या दिवसांमध्ये घरातून बाहेर पडताना हातमोजे, स्कार्फ, टोपी इत्यादी गोष्टी परिधान करते, कारण शरीराला थंड हवा स्पर्श करताच पुरळ येण्यास सुरुवात होते. 2014 मध्ये स्वतःच्या या ऍलर्जीबद्दल कळले होते. तेव्हापासून अत्यंत खबरदारी घ्यावी लागते असे त्या म्हणाल्या.
घ्यावी लागते खबरदारी
हिवाळय़ातच नव्हे तर उन्हाळय़ात देखील थंडीची जाणीव झाल्यास तिची प्रकृती बिघडते. उन्हाळय़ात शीतपेयाचा ग्लास पकडला तरीही शरीरावर फोड उठू लागतात. याचमुळे जर हिंमत करून शीतपेय पिल्यास देखील वारंवार ग्लास एका हातातून दुसऱया हातात बदलत असते. फ्रीजमधील वस्तू काढायची असल्यास हातमोजे परिधान करते. सुपरमार्केटमध्ये जाताना किंवा प्रवास करताना एसीपासून वाचण्याची खबरदारी घ्यावी लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वीजेच्या दरामुळे समस्या
इंग्लंडमध्ये विजेचे दर वाढल्याने माझ्या अडचणी अधिकच वाढत आहेत. अशा स्थितीत स्वतःचे घर उबदार ठेवण्यासाठी अधिक वीजेचा वापर करावा लागेल. यामुळे माझा खर्च देखील मोठय़ा प्रमाणात वाढणार असल्याचे विकी म्हणाली. विजेच्या बचतीसाठी तिने एक इलेक्ट्रिक लेगिंग खरेदी केली असून अन्य पर्यायांचा शोध घेत आहे.









