वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनच्या नॉटिंघमशायरमध्ये मंगळवारी तीन जणांची हत्या करण्यात आली आहे. ब्रिटनच्या प्रमाणवेळेनुसार ही घटना पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तर पोलिसांनी 31 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. दोन जणांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला मिळाले होते, तर तिसरा मृतदेह रस्त्यापासून काही अंतरावर आढळून आला होता. याचबरोबर तीन जण गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच घटनास्थळी बॉम्बविरोधी पथक तैनात करण्यात आले आहे.
याप्रकरणी कुठलीही माहिती देणे पोलिसांनी टाळले आहे. तसेच घटनेनंतर नॉटिंघमच्या दिशेने जाणारे सर्व रस्ते रोखण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. तीन जणांचे मृतदेह सापडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावरच 3 जण गंभीर जखमी आढळून आल्याने गुन्ह्याचे स्वरुप अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच हा दहशतवादी हल्ला होता का हे देखील स्पष्ट करण्यात आलेले नाही.









