क्षेत्रफळ समान, लोकसंख्या मात्र 4 पट अधिक : राज्याकडून प्रभावी उपाययोजना
जगभरात कोरोनाचा प्रकोप दिसून येत असताना उत्तरप्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने या महामारीवर बऱयापैकी नियंत्रण राखले आहे. विकसित देश असलेला ब्रिटन महामारीसमोर हतबल ठरला असताना त्याच्याइतकेच क्षेत्रफळ असणारा तसेच त्याच्यापेक्षा 4 पट अधिक लोकसंख्या असणारा उत्तरप्रदेश कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यास यशस्वी ठरला आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांसह बळींची संख्या वाढत असताना उत्तरप्रदेशात मात्र रुग्णसंख्या नियंत्रणात राहिली आहे.
उत्तरप्रदेशचे क्षेत्रफळ 93,933 चौरस मैल आहे. तर ब्रिटनचे क्षेत्रफळ 93,628 चौरस मैल आहे. ब्रिटनची लोकसंख्या 6.6 कोटी तर उत्तरप्रदेशात हाच आकडा 23 कोटी इतका आहे. एकीकडे ब्रिटन विकसित देश असून वैद्यकीयपासून अन्य सर्व सुविधांबाबत त्याचे उदाहरण दिले जाते. तर दुसरीकडे विकसनशील देश असलेल्या भारतात उत्तरप्रदेश तुलनेने गरीब राज्य आहे. परंतु कोरोना संकटादरम्यान ब्रिटनचे व्यवस्थापन अपयशी ठरले आणि उत्तरप्रदेशच्या योगी सरकारचे व्यवस्थापन उदाहरण ठरले आहे.
उत्तरप्रदेशात 1 टक्के रुग्णांचा मृत्यू
उत्तरप्रदेशात बुधवार सकाळपर्यंत 16,720 संशयितांच्या चाचण्या झाल्या असून यातील 705 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण चाचण्यांपैकी केवळ 4.2 टक्के जणच पॉझिटिव्ह निघाले आहेत. तर राज्यात 8 जणांना जीव गमवावा लागला आहे. एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ 1 टक्के आहे. या आकडेवारीतून तबलिगी सदस्य तसेच संपर्कात आलेल्या रुग्णांना वगळल्यास हे प्रमाण अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी राहते.
कठोर निर्णय, प्रभावी व्यवस्थापन
आकडेवारीतून उत्तरप्रदेशने कोरोनावर बऱयापैकी नियंत्रण मिळविल्याचे दिसून येते. देशव्यापी लॉकडाउन लागू होण्यापूर्वीच योगींनी कठोर निर्णय घेण्यास प्रारंभ केला होता. त्यांनी राज्यात विविध निर्बंध लादून कोरोनावर नियंत्रण राखण्याचा मार्ग तयार केला होता.
स्पेशल-11
कोरोनावर नियंत्रणासाठी योगींनी 11 समित्यांची स्थापना केली आहे. गरिबांना सुविधा मिळण्यास प्रारंभ झाल्यावर त्यांनी टाळेबंदीच्या नियमांचे पालन केल्याने फैलाव रोखण्यास बऱयापैकी यश मिळाले आहे. आवश्यक सामग्रीच्या होम डिलिव्हरीपासून गरिबांसाठी कम्युनिटी किचनद्वारे भोजन पोहोचविण्याच्या निर्णयामुळे जनतेला विश्वासात घेण्यास यश आले.
ब्रिटनची आकडेवारी
ब्रिटनमध्ये आतापर्यंत 3,82,650 चाचण्या झाल्या असून यात 93,873 बाधित आढळले आहेत. म्हणजेच एकूण चाचण्यांमध्ये सुमारे 25 टक्के लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर देशात 12,107 जणांना जीव गमवावा लागला आहे. एकूण रुग्णांपैकी सुमारे 13 टक्के जणांचा मृत्यू झाला आहे.









