वृत्तसंस्था/ लेक्झिंग्टन
येथे सोमवारपासून सुरू झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या जोहाना कोंटाला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. पहिल्या फेरीतील सामन्यानंतर कोंटाची प्रकृती नादुरूस्त झाल्याने तिच्यावर तातडीने डॉक्टरी इलाज करण्यात आला.
या स्पर्धेतील पहिल्या फेरीच्या सामन्यात झेकच्या बोझकोव्हाने तृतीय मानांकित कोंटाचा 6-4, 6-4 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. हा सामना संपल्यानंतर काही मिनिटातच कोंटाला अस्वस्थ वाटू लागले. तिच्या हृदयाचे ठोके अचानक वाढले. त्यामुळे तिला अधिक अशक्तपणा जाणवू लागला.
पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात पोलंडच्या सहाव्या मानांकित लिनेटीने अमेरिकेच्या डेव्हिसचा 6-2, 6-2, टय़ुनेशियाच्या आठव्या मानांकित जेबुरने अमेरिकेच्या मॅकनेलीचा 6-2, 6-4, बेलारूसच्या द्वितीय मानांकित साबालेन्काने ब्रेंगेलीचा 6-1, 6-7 (5-7), 6-2 असा पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले.









