वृत्तसंस्था/ लंडन
एफ-वन मोटार रेसिंग क्षेत्रामध्ये ब्रिटनचे अव्वल जागतिक दर्जाचे चालक तसेच मर्सिडीस संघाचे माजी सदस्य स्टर्लिंग मॉस यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. मॉस यांना आपल्या वैयक्तिक मोटार रेसिंग एफ-वन क्षेत्रामध्ये एकदाही विश्वविजेतेपद मिळविता आले नाही. 1950 तसेच 1960 च्या दशकामध्ये मॉस यांनी एफ-वन ग्रा प्रि मोटार रेसिंग क्षेत्रामध्ये ब्रिटनच्या मॉस यांनी मर्सिडीस संघाचे प्रतिनिधीत्व करताना 16 ग्रा प्रि शर्यती जिंकल्या आहेत. मर्सिडीस संघातील पाचवेळा विश्व़विजेतेपद मिळविणाऱया मॅन्यूअल फेंगीओ यांचे मॉस सहकारी म्हणून ओळखले जात. ब्रिटनमध्ये झालेल्या पहिल्या ग्रा प्रि शर्यतीचे जेतेपद मिळविणारे हे ब्रिटनचे पहिले चालक होते. मोटार रेसिंग क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिल्याबद्दल 2000 साली स्टर्लिंग मॉस यांचा सर हा किताब देवून गौरव करण्यात आला होता. 2011 साली वयाच्या 81 व्या वर्षी ते मोटार रेसिंग क्षेत्रातील सर्व प्रकारातून निवृत्त झाले. मॉस यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना 2016 अखेरीस सिंगापूरच्या एका रूग्णालयात सुमारे पाच महिने वैद्यकीय इलाजासाठी ठेवण्यात आले होते.








