कोरोनावरील लसीला सरकारची परवानगी : पुढील आठवडय़ापासून लसीकरणास प्रारंभ
वृत्तसंस्था / लंडन
ब्रिटन हा कोरोनावरील लसीला परवानगी देणारा पहिला देश ठरला आहे. पुढील आठवडय़ात कोरोनावरील जगातील पहिली लस उपलब्ध होणार असून फायझर आणि बायोएनटेकच्या लसीला ब्रिटन सरकारने परवानगी दिली आहे. ब्रिटनमध्ये पुढील आठवडय़ापासून लसीकरणास प्रारंभ होणार आहे. अनेक देश लसनिर्मितीच्या प्रक्रियेत व्यस्त असल्यामुळे ही लस कधी वापरात येणार याकडे औत्सुक्याने पाहिले जात असतानाच ब्रिटनने बुधवारी जगाला आनंदवार्ता दिली.
कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी फायझर आणि बायोएनटेक या जागतिक पातळीवरील औषधनिर्मिती करणाऱया कंपन्यांनी विकसित केलेल्या लसीची परिणामकारकता 95 टक्के असल्याचे दिसून आले आहे. ‘बीएनटी162बी2’ या लसीच्या तिसऱया टप्प्यातील चाचणीचा अहवालही प्रसिद्ध करण्यात आला होता. या चाचणीमध्ये प्राथमिक अपेक्षित परिणाम साध्य होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या दोन्ही कंपन्यांनी या वर्षभरात जगभरासाठी लसीचे 5 कोटी डोसचे तर 2021 च्या अखेरपर्यंत 1.3 अब्ज डोसचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
जगाला वेठीस धरणाऱया कोरोना संकटावर मात करण्यासाठी सगळीकडेच युद्धपातळीवर लस निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोना महामारीविरोधातील लढाईत ब्रिटनने जोरदार मुसंडी मारली आहे. फायझर आणि बायोएनटेकच्या लसीचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटन सरकारने परवानगी दिलेल्या फायझरची लस पुढील आठवडय़ापासून ब्रिटनमध्ये उपलब्ध होणार आहे. सुरक्षितता, गुणवत्ता आणि परिणामकारक या सर्व मानकांमध्ये लस योग्य ठरली आहे. ब्रिटन सरकारने यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केले आहे.
कमी तापमानामुळे लसीकरणाचे आव्हान
फायझरची लस साठवण्यात काही अडचणी आहेत. डोसच्या साठवणुकीसाठी खूप कमी तापमान लागत असल्यामुळे लसीकरणाचे मोठे आव्हान ब्रिटनमधील वैद्यकीय यंत्रणेसमोर आहे. आतापर्यंत एकूण 170 स्वयंसेवकांवर लसीचे प्रयोग करण्यात आले असून वय, लिंग या सर्व पातळय़ांवर फायझरची लस प्रभावी ठरली आहे. ही लस वयस्कर व्यक्तींसह सर्वांमध्ये 95 टक्के प्रभावी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. वयोवृद्धांवरही या लसीची परिणामकारकता सिद्ध झाली आहे.
वयोवृद्धांना प्राधान्याने लसीकरण
ब्रिटनने लसीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात वयोवृद्धांना ही लस देण्याची तयारी चालवली आहे. फायझर ही लस सुरुवातीला घरातच असणारे ज्ये÷ लोक आणि घरगुती काम करणाऱया नागरिकांना प्राधान्याने देण्यात येणार असल्याचे फायझर-बायोएनटेकच्या लसीकरण योजनेच्या संयुक्त समितीतील प्रमुख प्रा. वेई शेन लिम यांनी स्पष्ट केले
आहे.
‘मॉडर्ना’च्या लसीसाठी अमेरिकेच्या हालचाली…
आपत्कालीन वापरासाठी अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसीला मंजुरी मिळावी, यासाठी अर्ज करण्यात आला. नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार कोरोना संसर्गावर ही लस 94.5 टक्के परिणामकारक असल्याचे दिसून आले. काही प्रौढ रुग्णांमध्ये ही लस 100 टक्के प्रभावी असल्याचे निदर्शनास आले आहे. ही लस मॉडर्ना कंपनी आणि अमेरिका सरकारची राष्ट्रीय आरोग्य संस्था ही एकत्रिपणे विकसित करत आहे. अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून लस निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. आता युरोप किंवा अमेरिकेतही लस येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.









