प्रतिनिधी/ बेळगाव
जुनेबेळगाव कलमेश्वर मंदिरापासून हालगा गावापर्यंत शिवारामधून गेलेल्या रस्त्यावरील ब्रिजखाली कचरा साचला आहे. कचरा साचल्याने बळ्ळारी नाल्यातील पाणी थेट शेतीमध्ये शिरले. यामुळे भात पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच या मार्गावर वर्दळ नसल्यामुळे मद्यपींची संख्या वाढली असून त्यांच्याकडून काचेच्या बाटल्या फोडून त्या शेतामध्ये व ब्रिजखाली टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे याचा फटका शेतकऱयांना बसत असून शेतकऱयांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरवषी बळ्ळारी नाला स्वच्छता करण्याबाबत मोठ मोठी आश्वासने देण्यात येतात. परंतु प्रत्यक्षात मात्र असे कोणतेच काम केले जात नाही. नाल्यात टाकण्यात आलेले प्लास्टिक, कचरा हा वाहून शिवारातील लहान ब्रिजच्या पाईपमध्ये अडकत आहे. यामुळे पावसाचे पाणी निचरा न होता शेतामध्ये शिरत आहे. यामुळे बांध फुटून शेतीचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱयांमधून होत आहे.
वारंवार मागणी करूनही या नाल्याची स्वच्छता अद्याप करण्यात आलेली नाही. तसेच मद्यपींमुळे शेतकऱयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱयांकडून करण्यात येत आहे. यावेळी जोतिबा भोसले, नितीन खन्नूकर, मोहन बेनके, मारुती पुजारी, यल्लाप्पा बायाण्णाचे, संतोष शिवनगेकर, सतीश खन्नूकर, संपत होसूरकर, बाबू ताशिलदार, प्रथमेश तारीहाळकर, नावगेकर यासह इतर शेतकरी उपस्थित होते.
प्रशासनाने लक्ष द्यावे : शांताराम होसूरकर (शेतकरी)
बळ्ळारी नाल्यातून कचरा वाहून येऊन या ठिकाणी अडकत आहे. प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्या यामुळे पाईप भरल्या असून पाणी थेट शेतांमध्ये शिरत आहे. यामुळे शेतीचे नुकसान होत असून प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी शांताराम होसूरकर यांनी केली.









