वृत्तसंस्था/ योकोहामा
ब्राझीलने ऑलिम्पिक फुटबॉलचे सुवर्ण स्वतःकडेच राखताना अंतिम लढतीत स्पेनचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. बदली खेळाडू माल्कमने जादा वेळेत नोंदवलेला गोल निर्णायक ठरला. मेक्सिकोने कांस्य जिंकून या प्रकारातील दुसरे ऑलिम्पिक पदक मिळविले.
नियमित वेळेत 1-1 अशी बरोबरी झाल्यानंतर जादा वेळेत माल्कमने अँटोनीकडून मिळालेल्या तिरकस पासवर ताबा घेत जीजस व्हॅलेव्हला हुलकावणी देत मारलेला जोरदार ड्राईव्ह गोलजाळय़ात गेला आणि ब्राझीलचे सुवर्ण निश्चित झाले. मागील वेळी मायदेशातच झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्येही ब्राझीलने सुवर्ण पटकावले होते. त्याआधी 39 व्या मिनिटाला आघाडीवीर रिचर्लिसनने पेनल्टी स्ट्रोकची संधी वाया घालवली. मात्र मध्यंतराच्या ठोक्याला ब्राझीलने आघाडी घेतली. क्लॉडिन्होच्या क्रॉस पासला डॅनी अल्वेसने ऍक्रॉस फटका मारला. कुन्हाने तो थोपविला आणि गोलजाळय़ामध्ये अचूक मारला.
स्पेननेही नंतर आक्रमण करीत संधी निर्माण केल्या. पण ब्राझीलने भक्कम बचाव केला. मात्र 61 व्या मिनिटाला स्पेनला बरोबरी साधण्यात यश आले. बदली खेळाडू कार्लोस सोलरने उजवीकडून आगेकूच केली आणि गोलपोस्टच्या जवळच असलेल्या मिकेल ओयारझाबालकडे क्रॉसपास पुरविला. त्याने डाव्या पायाने मारलेली व्हॉली सँटोसला हुलकावणी देत गोलजाळय़ात जाऊन विसावली. नियमित वेळेतील शेवटच्या पाच मिनिटांत स्पेनने जोरदार आक्रमणे केली आणि दोनदा (86 व 88 वे मिनिट) गोलजाळय़ाच्या दिशेने फटके मारले. पण सदोष नेमबाजीमुळे ते वाया गेले. नियमित वेळेत बरोबरी झाल्यानंतर जादा वेळेत माल्कमने निर्णायक गोल नोंदवून स्पेनचे आव्हान संपुष्टात आणले.
याआधी शुक्रवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत मेक्सिकोने यजमान जपानचा 3-1 असा पराभव करून कांस्यपदक पटकावले. मेक्सिकोचे हे ऑलिम्पिकमधील दुसरे पदक असून यापूवीं 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळविले होते.









