महामारी काळात 800 मृत्यूंनी हादरला देश
वृत्तसंस्था / ब्राझिलिया
कोरोना महामारीला तोंड देणाऱया ब्राझीलमध्ये गरोदर महिलांसाठी हे संक्रमण जीवघेणे ठरत आहे. ब्राझीलमध्ये गरोदर महिला तसेच प्रसुतीनंतर त्वरित 800 महिलांच्या मृत्युमुळे पूर्ण देश हादरून गेला आहे. गर्भधारणेची योजना काही काळासाठी टाळावी असा इशाराच देशातील अधिकाऱयांनी महिलांना दिला आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत कोरोना महामारीमुळे 4 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
ब्राझीलच्या एका टास्कफोर्सनुसार मागील वर्षापासून आतापर्यंत कोरोना महामारीमुळे देशात किमान 803 गरोदर असणाऱया आणि प्रसूतीनंतर महिलांचा मृत्यू झाला आहे. यातील 432 महिलांचा मृत्यू यंदा झाला आहे. ब्राझीलमध्ये चालू वर्षात कोरोना महामारी सर्वात धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. अलिकडच्या काळात ब्राझीलमधील वृत्तपत्रांमध्ये गरोदर महिलांच्या मृत्यूंच्या बातम्यांचे प्रमाण वाढलेले दिसून आले आहे.
जगभरात कोरोना संकटादरम्यान गरोदर महिलांच्या आरोग्याबाबत सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. ब्राझीलमधील स्थिती जगातील अन्य देशांच्या तुलनेत अधिक खराब असल्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे. याचमुळे अधिकाऱयांनी संकट कमी होईपर्यंत गर्भधारणा टाळण्याचा इशारा दिला आहे. एका अनुमानानुसार जगभरात कोरोनामुळे होणाऱया गरोदर महिलांच्या मृत्यूंपैकी 77.5 टक्के ब्राझीलमध्ये झाले आहेत.









