आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातील फुटबॉल सम्राट तसेच ब्राझीलचे फुटबॉल ‘किंग’ पेले यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. सँटोसच्या स्टेडियमवर त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. लाखो फुटबॉल शौकिनांनी त्यांचे दर्शन घेऊन त्यांना अखेरचा साश्रुपूर्ण निरोप दिला.
ब्राझीलचे फुटबॉल सम्राट पेले यांचे गेल्या गुरुवारी वयाच्या 82 व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले होते. पेले यांनी कर्करोगाशी बरीच वर्षे झुंज दिली होती. पेले यांनी आपल्या वैयक्तिक फुटबॉल कारकिर्दीत ब्राझीला तीन वेळा फिफाचा विश्वकरंडक जिंकून दिला होता. सँटोसच्या या फुटबॉल स्टेडियममध्ये पेले यांचा मृतदेह सुमारे दोन तास मैदानाच्या मध्यभागी ठेवण्यात आला होता. फुटबॉल क्षेत्रात 10 क्रमांकाची जर्सी पेले यांच्या कामगिरीमुळेच प्रसिद्ध झाली. मंगळवारी सँटोसच्या प्रमुख मार्गावरुन त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. या अंत्ययात्रेमध्ये ब्राझीलचे वरिष्ठ नेते तसेच आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शासकीय इतमामाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. पेले यांनी आपल्या 21 वर्षांच्या फुटबॉल कारकिर्दीत 1283 गोल नोंदविले आहेत.









