अध्याय चोविसावा
भगवंत उद्धवाला ब्रह्मांडाच्या निर्मितीचे रहस्य समजाऊन सांगत आहेत. ते म्हणाले, जोपर्यंत माया स्थिर असते तोपर्यंत त्रिगुण साम्यावस्थेत असतात आणि एकटेच ब्रह्म अस्तित्वात असते. जेव्हा ब्रह्माला मी ब्रह्म आहे असे स्फुरते तेव्हा त्रिगुणांची साम्यावस्था डळमळीत होऊन त्यातून अहंकाराचा जन्म होतो. अहंकार हाही सात्विक, राजस आणि तामस अशा तीन प्रकारचा असतो. सात्विक अहंकारापासून मन, बुद्धी, चित्त आणि ज्ञानेंद्रिये तयार होतात तर राजस अहंकारापासून इंद्रिये तयार होतात.
तामस अहंकारापासून पंचमहाभूतांनी बनलेला देह तयार होतो. हा ब्रह्मांडरूपी देह माझाच असतो. त्या मागे माझीच प्रेरणा आहे. माझ्या प्रेरणेने हे सर्व पदार्थ एकत्र होऊन एकमेकात मिसळले गेले आणि त्यातून ब्रह्मांडरूपी अंडे उत्पन्न झाले. ब्रह्मांड हे माझे उत्तम निवासस्थान आहे. माझ्या लीलेने मी पंचमहाभूतांनी तयार केलेला देह धारण केला. माझ्या नाभीमध्ये विश्वाला आधारभूत असे नाभिकमल उत्पन्न झाले आणि त्यात उत्तमोत्तम असा ‘आत्मभू’ नामक ब्रह्मदेव सृष्टि निर्माण करण्याकरिता रजोगुणाच्या प्राधान्येकरून स्वतःच जन्मास आला. विश्वरूप ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली आणि माझ्या कृपेने रजोगुणाच्या द्वारे पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्ग या तीन लोकांची व त्यांच्या लोकपालांची निर्मिती केली. गंम्मत म्हणजे ब्रह्मदेव जरी इतरांचा निर्माता असला तरी त्याला निर्माण होण्यास कारणीभूत असलेल्या मला नारायणाला मात्र तो पाहू शकला नाही. कारण तो स्वतःच कमळात बसलेला असल्यामुळे त्या कमळाचे मूळ काही त्याला दिसेना. तो रजोगुणाला भुलल्यामुळे त्याला सर्व एकरूप समुद्रासारखे पाणीच पाणी दिसू लागले.
कमळाचे मूळ पाहण्याकरिता त्याने त्या समुद्रात बुडी मारली आणि किती तरी दिवस पाण्यातच बुडून होता, तरी देखील त्या ब्रह्मदेवाला त्या कमळाच्या मूळाचा शोध काही लागला नाहीच. अखेरीस तेथे तो पाण्याच्या भीतीने घाबरून गेला आणि झटकन पाण्याच्या बाहेर येऊन उसासे टाकू लागला. मग तो त्या कमळावर पुन्हा बसला पण पुढे काय करावे हे त्याला सुचेना. तो मला म्हणाला, “हे अच्युता! धावत ये आणि मला प्रसन्न हो. मला जगाविषयी आलेले अंधत्व नाहीसे कर. तुझ्याशिवाय माझे सर्वस्वी रक्षण करणारा दुसरा कोणी नाही. ब्रह्मदेव माझ्याच पोटचे लेकरू. रजाने बिचारे केवळ आंधळे झाले. म्हणून तो नाभिकमळालाच धरून बसला. तेव्हा मला तत्काळ त्याची दया आली. मज विश्वात्म्याचाच तो पुत्र पण केवळ जडत्वाने स्तब्ध होऊन राहिला. तेव्हा त्या तपोनि÷ाला सृष्टि निर्माण करण्याकरिता मी उपदेश केला. मी आपल्या आकाशवाणीने ‘तप तप’ या दोन शब्दांनी श्रे÷ ब्रह्मदेवाला महाकल्पाच्या आरंभी उपदेश केला. मी सांगितल्याप्रमाणे त्याने तप करताच त्याचा सत्त्वगुण वाढला आणि त्याच्या त्या पूर्ण सत्त्वगुणानेच मी प्रत्यक्ष नारायण झालो. “त्रिकालाबाधित विश्वात्मा खरोखर तूच आहेस’’ अशा अर्थाच्या चतुःश्लोकी भागवताचा मी त्याला उपदेश केला. त्या माझ्या उपदेशाने तो समबुद्धी होऊन राहिला आणि कल्पाचे अनेक कल्प गेले तरी खरोखर त्याला मोहाने स्पर्शही केला नाही.
याप्रमाणे कल्पाच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने समाधी धारण केली, तेव्हा त्याला आत्मबुद्धी प्राप्त होऊन त्याने ही सर्व उत्पत्ती करण्याचे कार्य सिद्धीस नेले. देव, राक्षस, मनुष्य, सर्प यांची वस्ती असलेले तिन्ही लोक, सात पाताळे व तशीच विलक्षण सात गोपुरेही त्याने निर्माण केली. ‘भूः’ म्हणजे पाताळलोक, ‘भुवः’ म्हणजे मृत्युलोक आणि ‘स्वः’ म्हणजे स्वर्गलोक, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांनी मिळून जे तयार होते त्याला त्रिभुवन असे नाव आहे. सर्व मिळून चौदा लोक व तेथे राहणारे लोकपाल, हे सर्व सविस्तरपणे स्पष्ट करून मी तुला सांगतो. ब्रह्मदेवाने देवतांचे निवासस्थान स्वर्ग, भूतप्रेतांचे अंतरिक्ष आणि मनुष्य इत्यादींसाठी पृथ्वी हे स्थान ठरविले. या तीन लोकांच्या वरच्या बाजूला महर्लोक इत्यादी सिद्धींची निवासस्थाने ठरविली.
क्रमशः








