चिमुकलीचा ‘लंगार नृत्य’ व्हीडिओ प्रचंड व्हायरल : कौतुकाचा वर्षाव : कसालनजीक कुसबेची सुकन्या
तेजस देसाई / दोडामार्ग:
मयुर गवळी यांनी दशावतारात ‘लंगार’साठी म्हटलेल्या व नंतर प्रत्येकाच्या तोंडी बसलेल्या ‘भाव अंतरीचे हळवे’ या कडव्याबद्दल आता नव्याने काही सांगायची गरज नाही. या एका कडव्यावर किती व्हीडिओ बनले असतील, याची ‘गिनती’च न केलेली बरी. मयुर गवळींनी गायिलेले हे कडवे एका हिंदी चॅनेलवरील डान्स शोमध्येही पोहोचले. या कडव्यावर बनविलेल्या अनेक व्हीडिओंवर ‘लाईक’चा भडिमार झाला. त्यातील काही व्हीडिओ कौतुकाचाही विषय ठरले. त्या पैकीच एक म्हणजे कसालनजीक कुसबे येथील हर्षदा संदीप गावकर या नऊ वर्षीय मुलीने या कडव्यावर केलेले नृत्य.
हा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला. सुंदर ‘लंगार नृत्य’ करणारी कोण ही मुलगी? अशी विचारणा होऊ लागली. चौकशीअंती कुडाळ तालुक्यातील कुसबे येथील हर्षदा संदीप गावकर या मुलीने हे नृत्य केल्याचे समजले. तिचे वय अवघे नऊ वर्षे असून पोखरण नं. 1 या प्रशाळेत इयत्ता सरीमध्ये ती शिकत आहे. कुसबे गावातील मधलीवाडी येथील हे गावकर कुटुंब रहिवासी आहे. आई-वडील, आजी-आजोबा असे हर्षदाचे कुटुंब आहे. वडील किरकोळ शेती व स्वत:जवळील मारुती ओमनी कारच्या सहाय्याने चरितार्थ चालवतात.
घरासमोरील अंगणात बनविला व्हीडिओ
काही दिवसांपूर्वी हर्षदाचे वडील संदीप गावकर यांचा एक मित्र मुंबईहून गावी आला होता. त्यावेळी हर्षदा त्यांच्या घरी गेली होती. आपल्या घरातील म्युझिक सिस्टीमवर संदीप गावकर यांच्या मित्राने हे ‘भाव अंतरीचे’ हे लंगार कडवे लावले व सहज बोलता बोलता हर्षदाला नृत्य करण्यास सांगितले. त्यावेळी अगदी पारंगतपणे या नृत्यावर हर्षदाची पावले सफाईदारपणे थिरकली. संदीपच्या मित्रालासुद्धा हर्षदाच्या नृत्याचा हा व्हीडिओ बनविणे आवरले नाही. त्यांनी लगेच चित्रिकरण केले. अन नंतर फेसबूक, व्हॉटस्ऍप, यू-टय़ूबवर हा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला. या व्हीडिओला हजारो लाईकस् मिळाले. अनेकांच्या स्टेटसला व्हीडिओ राहिला.
हर्षदाला नृत्याचे उपजतच वेड
कु. हर्षदाला नृत्याचे वेड हे उपजतच आहे. इयत्ता पहिलीमध्ये कुसबेवाडीतील शाळेच्या भगवती मंचावर तिने पहिले भावगीत नृत्य सादर केले होते. तिची नृत्यकलेतील आवड लक्षात घेऊन वडिलांनी तिला कथ्थक नृत्याचे धडे मिळण्यासाठी सावंतवाडीतील कश्मिरा पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिकवणी सुरू केली आहे. ओरोस येथे पावसकर यांच्या क्लासमध्ये हर्षदा नृत्य शिकत आहे.
महिला दिनी हर्षदाचा सन्मान चिमुकल्या हर्षदाचे हे लंगार नृत्य सोशल मीडियावर पाहिल्यानंतर जिल्हा परिषद वेंगुर्ले शाळा नं. दोनचे मुख्याध्यापक वासुदेव कोळंबकर प्रभावित झाले. त्यांनी या मुलीचा शोध घेऊन तिला महिला दिनी प्रोत्साहित करण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यांनी आपल्या जिल्हय़ातील शिक्षक मित्रांशी संपर्क साधून तिचा शोधही घेतला. महिला दिनी ते तिच्या घरी पोहोचले. हर्षदाच्या कुटुंबियांशी संवाद साधून तिच्या कलागुणांना प्रोत्साहन म्हणून गौरव प्रमाणपत्र, शैक्षणिक साहित्य व रोख स्वरुपात पारितोषिकही त्यांनी दिले.










