महामार्गावर झाराप येथील घटना
वार्ताहर / कुडाळ:
मुंबई-गोवा महामार्गावर झाराप (भावई मंदिर फाटा) येथे सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱया बोलेरो पिकअपची समोर आलेल्या वेगो दुचाकीला धडक बसली. यात दुचाकीस्वार तेर्सेबांबर्डे उपकेंद्राच्या आरोग्यसेविका सौ. गीतांजली गणपत शिरोडकर (48, रा. बिबवणे) यांना गंभीर दुखापत झाली. सावंतवाडी कुटीर रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना म्हापसा-गोवा येथील व्हिजन रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना बुधवारी सकाळी 9.30 च्या सुमारास घडली.
महम्मद मकबूल महबूब (21, मूळ रा. झारखंड, सध्या रा. निवती) आपल्या ताब्यातील बोलेरो पिकअप घेऊन महामार्गावरून सावंतवाडीच्या दिशेने जात होता, तर गीतांजली शिरोडकर वेगो दुचाकी घेऊन जात होत्या. झाराप येथे पिकअपसमोर वेगो आल्याने पिकअपची धडक बसली. यात सौ. शिरोडकर यांना गंभीर दुखापत झाली. पं. स. सदस्या स्वप्ना वारंग यांनी तेथे धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांना व्हिजन रुग्णालयात हलविण्यात आले. हवालदार मंगेश जाधव, दुमिंग डिसोजा व स्वप्नील तांबे यांनी पंचनामा केला. हवालदार भगवान चव्हाण तपास करीत आहेत. महम्मद महबूब याने अपघाताची खबर कुडाळ पोलिसांत दिली.









