या वषीच्या 5 सप्टेंबर या शिक्षक दिनास विशेष महत्त्व आहे. कारण नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत आहे. शैक्षणिक धोरण कितीही चांगले असले तरी प्रश्न आहे तो अंमलबजावणीचा. शिक्षण हा सर्वांच्याच जिव्हाळय़ाचा विषय, परंतु त्याची व्याप्तीही मोठी आहे. सामान्यांच्या दृष्टिकोनातून आज शिक्षक दिनी शिक्षण क्षेत्राचा हा घेतलेला थोडक्मयात मागोवा…
फार पूर्वीच्या काळी भारतामध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ऋषीमुनींच्या आश्रमात पाठवत असत. भारतीयांना आदर्शवत असलेल्या राम आणि कृष्ण अशा आश्रम शाळेच्या संस्कारातून बाहेर पडले. निसर्गाच्या सान्निध्यात व दूरवर जंगलात असलेला ऋषीमुनींचा प्रत्येक आश्रम म्हणजे एक विद्यापीठ होते व आजच्या भाषेत ते पूर्णपणे स्वायत्त होते. प्रत्यक्ष 10-12 वर्षे गुरुचा शिष्याशी सहवास, त्यामुळे संस्कारित विद्यार्थ्यांची पिढी बाहेर पडत असे. आजच्या काळातील आश्रम शाळा, रविंद्रनाथांचे शांती निकेतन, संस्कार वर्ग, वस्ती शाळा ही पूर्वीच्या ऋषीमुनींच्या आश्रमांची सुधारित प्रारुपे आहेत.
आधुनिक मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून शिकणे ही नैसर्गिक क्रिया आहे. फार तर शिकवणे ही शिकण्याला पूरक प्रक्रिया म्हणावी लागेल. म्हणूनच आईनस्टाईन म्हणत असे मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा शिकण्यास अवकाश देतो. शिकणे ही जर नैसर्गिक प्रक्रिया असेल तर माझा पाल्य केवळ परीक्षेच्या मार्कावर इंजिनिअर किंवा डॉक्टर होण्याचा आग्रह कशासाठी. अनेक मानसशास्त्राच्या कसोटय़ामुळे लहानपणीच मुलाचा नैसर्गिक कल व आवड कळू शकते. नैसर्गिक प्रेरणेतून पाल्याला शिकू देण्यामध्ये राष्ट्राचे व समाजाचे हित दडलेले आहे.
स्वातंत्र्यानंतर पहिल्या काळामध्ये 11 वीपर्यंत शालेय शिक्षण व त्यानंतर महाविद्यालय व विद्यापीठ शिक्षण होते. त्यानंतर 10+02+03 हे शैक्षणिक धोरण 1985 साली अमलात आले. त्यानंतर जवळ जवळ 35 वर्षांनंतर 05+03+04 हे धोरण भारतीय जनता पक्षाच्या सरकारने राबविण्याचे ठरविले आहे. केवळ शैक्षणिक धोरण बदलून चालणार नाही. तर प्रश्न आहे. गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळण्याचा. शिक्षण क्षेत्रामध्ये परीक्षा नको असे कोणीच म्हणणार नाही. मिळालेले ज्ञान विद्यार्थ्याने आत्मसात केले की नाही याची ती कसोटी असते. परीक्षा म्हणजे शिक्षा नसून ती सुधारण्याची एक संधी आहे. हा संस्कार आपण विद्यार्थ्यांच्या मनावर रुजविण्यास कमी पडलो. त्यामुळे कित्येक विद्यार्थी परीक्षेच्या तणावाखाली किंवा परीक्षेत नापास होईन असे समजून किंवा नापास झाल्यानंतर आपले जीवन संपवितात. या दृष्टिकोनातून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये बोर्ड परीक्षेचे महत्त्व कमी केले ते एका दृष्टीने योग्य झाले. दरवषी विद्यार्थ्यांची वाढणारी संख्या व कमी होत जाणारे शिक्षक त्यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन ही एक समस्या होऊन बसली आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मूल्यांकन कार्यक्रमामध्ये (PISA) भारतातील विद्यार्थ्यांचा क्रमांक बराच खाली आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान मूल्यमापन (Online) व शिक्षण ही काळाची गरज होऊन बसली आहे.
माहिती ज्ञानाचा साठा असलेली ग्रंथालये मागे पडून त्याची जागा मेबाईल, संगणक, आयपॅड, इंटरनेट, फेसबुक यांनी घेतली आहे. घरामध्ये बसून नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाटेल तेवढे माहिती ज्ञान विद्यार्थ्यांना मिळविता येते. पूर्वीच्या काळी विद्यार्थी व शिक्षकांना माहिती, ज्ञान कमी होते परंतु आत्मसात करण्यास भरपूर वेळ होता. प्रचंड माहिती ज्ञानाच्या अधिपत्याखाली वावरणाऱया शिक्षण क्षेत्रातून आत्मनिर्भरता, आत्मविश्वास, स्वतंत्रपणाने विचार करण्याची क्षमता, स्वतंत्रपणे जगण्याची सवय, ज्ञानाचे कौशल्यामध्ये व जाणिवेमध्ये रूपांतर या गोष्टी नवीन पिढीमध्ये निर्माण होणार का, हा खरा प्रश्न आहे. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये घरातून काम ही संकल्पना रुजू पहात होती. कोरोनाच्या संकटानंतर आज 5-6 महिने शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे घरातून अथवा ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा विचार होत आहे. तरी प्रत्यक्ष वर्गामध्ये शिकवण्याच्या पद्धतीला ऑनलाईन शिक्षण हा पर्याय होऊ शकत नाही तर तो पूरक असू शकतो. प्रत्यक्ष वर्गामध्ये शिकविण्यामध्ये विद्यार्थ्यांचे सहजीवन, विद्यार्थ्यांची मानसिक वाढ, मैदानी खेळ, सामाजिक भान, शिक्षकांनी केलेले संस्कार, शिस्त अशा अनेक चांगल्या गोष्टी आहेत. ज्या नवीन तंत्रज्ञान शिक्षण पद्धतीत नाहीत. नवीन तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रामध्ये राबवितांना ते खेडय़ापाडय़ातील दुर्गम भागातील गरीब विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या तऱहेने पोहोचविण्याची जबाबदारी ही सरकारची असेल, असे तंत्रज्ञान राबविताना विद्यार्थी त्याचा दुरुपयोग करणार नाही हे पाहण्याची जबाबदारी शिक्षकाप्रमाणेच पालक व समाजाची असणार आहे.
सर्वच विषय अभ्यासण्याची कुवत सर्वसाधारण विद्यार्थ्यांमध्ये नसते त्यामुळे विविध विद्या शाखेच्या भिंती आपण निर्माण करतो. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विज्ञान शाखेचा विद्यार्थी कला शाखेचा अभ्यास करू शकेल व कला शाखेचा विद्यार्थी विज्ञान शाखेचा अभ्यास करू शकतो. ही शैक्षणिक तरलता विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीला चालना देणारी आहे. अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी उत्तम गाऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे महेश काळे आहे.
शिक्षण क्षेत्रामध्ये ज्ञान हे प्रवाही असते. या प्रवाहाचा वेग आज प्रचंड आहे. पूर्वीच्या काळी एकच विषय शिक्षक सेवानिवृत्त होईपर्यंत शिकवत असत. त्यामुळे त्या ज्ञानातील त्यांना परिपूर्णता मिळत असे. परंतु आजच्यासारखे त्यातील नवीन ज्ञान सहज मिळण्याची शक्मयता नव्हती. माहिती तंत्रज्ञानामुळे नवीन ज्ञानाच्या वाढणाऱया कक्षा व बदलाला सामोरे जाणारा व ते आत्मसात करून कौशल्याने विद्यार्थ्यांना प्रदान करणारा शिक्षक हवा. त्यामुळे पूर्वीच्या शिक्षकाच्या मानाने आजच्या शिक्षकाच्या जबाबदाऱया कैकपटीने वाढल्या आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये संशोधन व सृजनतेला महत्त्व आहे. या दृष्टिकोनातून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये चार वर्षांच्या महाविद्यालयीन शिक्षणानंतर विद्यार्थ्याला संशोधन क्षेत्रामध्ये आपले व्यक्तिमत्त्व घडविता येणार आहे. मध्येच विद्यार्थ्यांने शिक्षण सोडल्यास त्याचे नुकसान होणार नाही याचीही काळजी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये घेतली गेली आहे.
चीनबरोबर आपण करीत असलेली स्पर्धा व आपल्यापेक्षा चीनची राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा जास्त शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक, कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्रमानव, विकसित होणारे जैव तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान, मानवी मूल्यांचा समावेश, तरुणांच्या आशा आकांक्षांना स्थान अशा अनेक गोष्टींचा विचार नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविताना करावा लागणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण कितीही चांगले असले तरी प्रश्न आहे तो अंमलबजावणीचा.
प्रा. डॉ. भगवान वालवडकर, सांगली








