प्रतिनिधी / शिरोडा
आवेडे बोरी येथील श्री साईबाबा सेवा मंडळ ट्रस्टच्या श्री साईबाबा मंदिरतर्फे कोरोना आपत्ती साहाय्य निधीपोटी रु. 5 लाख मुख्यमंत्री निधीत जमा करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे हा धनादेश सुपुर्द करण्यात आला.
बोरीच्या श्री साईबाबा मंदिरतर्फे आपल्या विविध धार्मिक कार्यक्रमासह विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले जातात. गरजूंना आर्थिक सहाय्य पुरवले जाते. याशिवाय गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या वितरीत केल्या जातात. सध्या देशावर करोनाची महाआपत्ती कोसळल्याने आर्थिक मदतीची गरज आहे. या सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन साईबाबा मंदिरतर्फे 5 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द करण्यात आले. यावेळी साईबाबा सेवा मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष जीवनदास बोरकर, उपाध्यक्ष कमलाकर नाईक, कोषाध्यक्ष शांताराम नाईक आणि गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर हे उपस्थित होते.