प्रतिनिधी/ शिरोडा
बोरी पंचायत क्षेत्रात कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने काल बुधवार 8 जुलैपासून सुरु झालेल्या स्वेच्छा लॉकडाऊनला पहिल्या दिवशी येथील उद्योजक व दुकानदारांनी चांगला पाठिंबा दिला आहे. पाच दिवस पुकारलेल्या स्वेच्छा लॉकडाऊनला 12 जुलैपर्यंत येथील नागरिकांनी सहकार्य करण्याचे ठरवले आहे.
कोरोनासंबंधी खबरदारीचा उपाय म्हणून बोरी पंचायतीतर्फे सरपंच भावना नाईक यांनी येथील नागरिकांना व उद्योजकांना स्वेच्छेने आपले दुकान बंद करून नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले होते. याला येथील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे.
टॉपकोला भागापासून सुरुवात झालेल्या बोरी गावात सर्व दुकाने बंद होती. फक्त बँक व अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळल्यास रस्त्याच्या बाजूला बसणारे मासे विपेते, फूल विक्रेते व भाजी विक्रेत्यांनीसुद्धा या बंदमध्ये सहभाग घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, पारपतीवाडा प्रभागातील पंचसदस्य विनय पारपती यांनी स्वत: पुढाकार घेऊन पंचायतीतर्फे देण्यात येणारी आरसीनीक आल्बम 20 या होमियोपॅथिक गोळय़ांचे आपल्या प्रभागात घरोघर वितरण केले. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या औषधाचा उपयोग करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार पंच विनय पारपती यांनी आपल्या मतदाराच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून पुढाकार घेऊन या औषधाचे स्वत: वाटप केले.
यावेळी त्यांनी औषध घेण्याबरोबरच सरकारने घालून दिलेले नियमांचे काटेकोरपणे पालन करा असे आवाहन करीत फेसमास्कचा वापर करा व कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्यास त्वरित आरोग्य खात्यात संपर्क साधण्याचा सल्ला दिला. 60 वर्षांवरील नागरिकांनी व 10 वर्षांखालील मुलांनी घराबाहेर न पडण्याचा सल्लाही यावेळी त्यांनी घरोघरी जाऊन दिला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार व पंचायतीतर्फे घेण्यात येणाऱया निर्णयाला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.









