प्रतिनिधी / सरवडे
बोरवडे ( ता. कागल ) येथील शेरीचा माळ नावाच्या शेतातील विहीरीत ऊसतोड मजुराचा मृतदेह सापडला. बापू भानुदास भोसले ( वय ४५, मूळ राहणार काठी, ता. इंदापूर, जि. पुणे, सध्या राहणार बोरवडे, ता. कागल ) असे मयताचे नाव आहे. आज सकाळी अकरा वाजता ही घटना उघडकीस आली. घटनेची नोंद मुरगूड पोलिसात झाली आहे.
याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, सरवडे ( ता. राधानगरी ) येथील अजित मारुती मोरे यांच्या ऊस वाहतूक ट्रॅक्टरवर ऊसतोडणी मजूर काम करतात. गुरुवार दि. ३ रोजी मयत बापू भोसले हा कोणालाही न सांगता गायब झाला होता. तेंव्हापासून अजित मोरे व इतर ऊसतोडणी मजूर त्यांचा शोध घेत होते.
आज सकाळी अकरा वाजता बोरवडे गावच्या पूर्वेला बिद्री साखर कारखान्याजवळ असलेल्या शेरीच्या माळ नावाच्या शेतातील सुर्याजी दत्तात्रय बलुगडे यांच्या मालकीच्या विहीरीत एका पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याचे काही ग्रामस्थांना दिसले. त्यांनी ही माहिती पोलिस पाटील गौतम कांबळे यांना दिली. त्यांनी तात्काळ मुरगूड पोलिसांना याबाबत कल्पना दिली.पोलिसांनी घटनास्थळावर भेट देवून मृतदेह पाण्याबाहेर काढला.
यावेळी पोलिसांनी मयताच्या खिशातील कागदपत्रांवरुन त्यांच्या नातेवाईकाकडे चौकशी केली असता, तो ऊसतोडणीसाठी आल्याचे समजले. याबाबत पोलिसांनी वाहनमालक अजित मोरे यांना याबाबत माहिती दिली. श्री. मोरे व अन्य मजूरांनी तो मृतदेह बापू भोसले यांचाच असल्याचे सांगितले.
पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुरगूड ग्रामीण रुग्णालयात पाठवला. रात्री उशीरा मयत भोसले यांच्या नातेवाईकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळ गावी नेला. या घटनेची वर्दी अजित मोरे यांनी मुरगूड पोलिसात दिली असून पुढील तपास पो.हे. काँ. गोंजारे करत आहेत.