प्रतिनिधी/ खेड
मुंबई गोवा महामार्गावर बोरज येथील पेट्रोल पंपावर अज्ञाताने 40 हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. याबाबत जागृती दळवी यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञाताने मोबाईलवरून कॉल करत दोन वाहने डिझेल भरण्यासाठी येत आहेत त्यांना डिझेल देण्याबाबत सूचना केली. त्यासाठी ऍडव्हॉन्स म्हणून त्यांच्या मोबाईलवर गुगल पेद्वारे सुरूवातीला दोन रूपये पाठवले. यानंतर कॉल करून खात्यात 30 हजार रूपये पाठवल्याचे सांगितले. या प्रकारानंतर पुन्हा कॉल करून दोन्ही वाहने येण्यास विलंब होईल, असे सांगून पाठवलेले 30 हजार रूपये परत पाठवा, असे सांगितले.
त्यानुसार दळवी यांनी 30 हजार रूपये परत पाठवले. यानंतरही अज्ञाताने दळवी यांना कॉल करून खात्यात चुकून पुन्हा 30 हजार रूपये पाठवले आहेत, असे सांगून मोबाईलमध्येच गुंतवून ठेवले. दळवी यांनी कुठल्याही प्रकारची खात्री न करता आणखी 10 हजार रूपये फोन पेद्वारे परत केले. दळवी यांनी बँक खाते तपासले असता खात्यात कुठल्याही प्रकारची रक्कम जमा झाली नाही. उलट त्याच्याच खात्यातून 40 हजार रूपये ट्रान्सफर होऊन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट पोलीस स्थानक गाठले.









