प्रतिनिधी / नागठाणे :
स्थानिक गुन्हे शाखा व बोरगाव पोलिसांनी भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात मोहीम तीव्र केली असून, शनिवारी दिवसभरात स्थानिक गुन्हे शाखेने चोरट्या दारू विक्री अड्ड्यावर व बोरगाव पोलिसांनी गुटखा विक्री दुकानावर छापा टाकून एका मारुती कारसह सुमारे १.४५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी आमिर गुलाब मुलाणी(वय.२९,रा.देशमुखनगर, ता.सातारा), उमेश चांदवाणी (रा.लाहोटीनगर, मलकापूर,कराड) या दारूविक्री करणाऱ्यांवर व महाबळ पेरगु देवाडीग्गा (वय .५५.रा.नागठाणे,ता.सातारा) या गुटखा विक्री करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शनिवारी सायंकाळी मारुती कार मधून एक इसम दारूचे बॉक्स घेऊन देशमुखनगर येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे रात्री पोलिसांनी देशमुखनगर येथे सापळा रचला. रविवारी पहाटे २ वाजता नांदगाव बाजूकडून आलेल्या कारची झडती घेतली असता त्यात देशी दारूचे सुमारे ३७,४४० रुपये किमतीचे १३ बॉक्स आढळून आले. यावेळी चालक आमिर मुलाणी यांच्याकडे अधिक विचारणा केली असता त्याने हे दारूचे बॉक्स पाचवड फाटा(कराड) येथील उमेश चांदवाणी याच्या प्रणव वाइन शॉप मधून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी दारूच्या बॉक्ससह मारुती कार असा १,३७,४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आमिर मुलाणी व उमेश चांदवाणी या दोघांविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
दुसऱ्या घटनेत शनिवारी सायंकाळी नागठाणे गावच्या हद्दीत कराड ते सातारा जाणाऱ्या महामार्गालगतच्या सेवा रस्त्यानजीक असलेल्या महाराजा पान स्टोलच्या आडोश्याला चोरून गुटखा विक्री होत असल्याची माहिती सपोनि डॉ.सागर वाघ यांना समजली.यावेळी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बोरगाव पोलिसांनी तेथे छापा टाकला.यावेळी पान टपरीच्या आडोश्याला महाबळ पेरगु देवाडीग्गा हा अवैधरित्या गुटखा विकताना सापडला. पोलिसांनी त्यांच्याजवळून ७,७१४ रुपये किमतीचा गुटखा जप्त करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.









